रशियावर वचक ठेवलेल्या युक्रेनच्या पंतप्रधान - युलिया तेमोसेंकोवा! या असत्या तर आजचं चित्र कदाचित वेगळं असतं?

लिस्टिकल
रशियावर वचक ठेवलेल्या युक्रेनच्या पंतप्रधान - युलिया तेमोसेंकोवा! या असत्या तर आजचं चित्र कदाचित वेगळं असतं?

रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात होऊन वर्षं उलटून गेले आहे. रशियाने आक्रमक रूप धारण करून युक्रेनची पुरती दाणादाण उडवून दिली आहे, हे रोजच्या बातम्या पाहता दिसतेच आहे. पण काही वर्षांपूर्वी मात्र अशी स्थिती बिलकुल नव्हती. कारण रशियाच्या ‘अरे’ ला ‘कारे’ ने उत्तर देणारे एक समर्थ नेतृत्व युक्रेनकडे होते. आजच्या घडीला तरी युक्रेनच्या जनतेला त्यांच्या या नेत्याची प्रचंड आठवण होत आहे. विशेष म्हणजे हा बुलंद आणि खंबीर आवाज कोणत्या पुरुष नेत्याचा नव्हता, तर एका स्त्रीचा होता. या स्त्रीचे नाव होते युलिया तायमोशेन्को.

युलिया तायमोशेन्को या युक्रेनच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. त्यांच्या कार्यकाळात रशिया खूपच नरमून असायचा. माझ्या देशाची एक इंच जमीनदेखील रशिया बळकावू शकत नाही असे ठणकावून सांगणाऱ्या त्या एकमेव नेत्या होत्या.

आज रशिया युक्रेनमध्ये घुसून युक्रेनची वाताहत करत आहे, पण जर आज ही महिला देशाच्या प्रमुखपदी असती तर ही वेळच आली नसती. २००५ मध्ये त्या पहिल्यांदा युक्रेनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. या काळात त्यांनी पश्चिमी देशांशी युक्रेनचे संबंध दृढ करण्याचे प्रयत्न केले. यानंतर २००७ मध्ये पुन्हा एकदा त्या देशाच्या पंतप्रधान बनल्या. यावर्षी फोर्ब्ज मासिकाने देखील त्यांना जगातील शक्तिशाली महिलांच्या यादीत तिसरे स्थान दिले होते. त्या फक्त युक्रेनच्याच नाही, तर पूर्व सोव्हिएत संघातील देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या.

 

युलिया तायमोशेन्को यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९६० रोजी युक्रेनच्या निप्रॉपेट्रोसमध्ये झाला. त्या तीन वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांनी त्यांच्या आईला सोडून दिले. तेव्हापासून त्यांनीही आपल्या नावामागे वडिलांचे नाव लावणे सोडून दिले. १९७९ साली त्यांनी अलेक्झांडर तायमोशेन्को यांच्याशी विवाह केला. यानंतर १९८४ साली त्यांनी निप्रॉपेट्रोस स्टेट युनिव्हर्सिटीतून अर्थशास्त्र विषयाची पदवी मिळवली. १९९५ साली त्या युनायटेड एनर्जी सिस्टीम ऑफ युक्रेन (UESU) च्या अध्यक्ष बनल्या. ही संस्था रशियाकडून गॅस आयात करत असे आणि तो पुढे पश्चिमी देशांना पाठवला जात असे किंवा युक्रेनमध्येच वितरीत केला जात असे. या बदल्यात UESU कडून रशियाला धातू, पाईप्स आणि अशाच काही इतर वस्तू देत असे. याच व्यवसायाने तिला ‘गॅस क्वीन’ अशी पदवी मिळवून दिली. देशातील विविध व्यावसायिकांना आपल्या उद्योग-धंद्याशी जोडून घेत त्यांनी आपल्या साम्राज्याचा आणखी विस्तार केला. याच काळात त्यांनी हळूहळू राजकारणात पाऊल रोवले.

युक्रेनमध्ये २००४ साली तत्कालीन राष्ट्रपती विक्टर युश्नकोव यांच्या विरोधात सुरू झालेल्या ऑरेंज रिव्होल्युशन या चळवळीतही सक्रीय होत्या. विक्टर युश्नकोव्ह यांचे पारडे राशियाच्या बाजूने झुकणारे होते. निवडणुकीत काही तरी काळाबाजार करून ते राष्ट्रपती झाल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्याच्या विरोधात ठाम आणि जाहीर भूमिका घेणाऱ्या युलिया यांना नंतर याची किंमत चुकवावी लागली. या आंदोलनात त्यांना जनतेनेही तितकीच साथ दिली.

या आंदोलनाने विक्टर युश्नकोव्ह यांना देशत्याग करण्यास भाग पाडले.

त्यानंतर २०१० च्या राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीत त्या सहभागी झाल्या. परंतु या निवडणुकीत विक्टर युश्नकोव्ह यांचे पारडे जड होते. ३.३% मतांनी त्या पिछाडीवर गेल्या. युश्नकोव्ह यांना विजय मिळताच त्यांची सूडबुद्धी जागृत झाली आणि खोट्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली युलिया यांना जेलमध्ये टाकण्यात आले.

२०११ ते २०१४ ही चार वर्षे त्यांनी तुरुंगातच काढली. या काळात त्यांचा प्रचंड शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. युलिया यांना त्यांच्या देशात ‘गॅस वूमन’ म्हणूनही ओळखले जाते. कारण त्यांचा देशात मोठ्याप्रमाणात गॅस पुरवठा करण्याचा उद्योग आहे. याच व्यवसायात त्यांनी मोठी अफरातफर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. परंतु युरोपियन युनियनपासून अमेरिकेपर्यंत सगळ्या पाश्चिमात्य देशांनी त्यांचे समर्थन केले आणि हे देश त्यांच्या बाजूने उभे राहिले. युक्रेनला नाटो देशाच्या संघटनेत स्थान मिळावे म्हणूनही त्यांनी प्रयत्न केले. नाटोचे सभासदत्व मिळवण्यासाठी त्या खूप आग्रही होत्या.

२०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा नशीब आजमावले. पण याही वेळेस त्यांच्या हाती निराशाच लागली. युलिया यांनी यावेळी विरोधी पक्षनेते पद स्वीकारले.

आज देशावर इतकी मोठी संक्रांत आली असताना त्या पुन्हा एकदा रशिया आणि पुतीन यांच्या दडपशाही विरोधात सक्रीय झाल्या आहेत. वयाच्या ६१व्या वर्षीही त्या तितक्याच नेटाने रशियाला प्रतिवाद करत आहेत. म्हणूनच तर देशाला त्यांच्या कार्यकाळाची आणि त्यांच्या परराष्ट्रीय धोरणांची आवर्जून आठवण येत आहे.

मेघश्री श्रेष्ठी