भ्रष्टाचार आणि घोटाळे म्हटल्यावर तुम्हाला स्टँप पेपर, कॉमनवेल्थ पासून ते कोलगेट आणि ४जी पर्यंत कितीतरी गोष्टी आठवतील! भ्रष्टाचार ही राजकारण्यांची एक ओळखच बनली आहे. मध्येच एखादी कंपनी येते, लोकांना त्यांचे पैसे दुप्पट करून देण्याचे, किंवा त्यांना विमा संरक्षण देण्याचे आमिष दाखवते. मार्केटिंग चेन पद्धतीने कंपनीचा विस्तार होतो, अनेक लोकांनी कंपनीचे एजंट म्हणून काम केलेले असते आणि एके दिवशी कंपनी आपला गाशा गुंडाळून बाजारपेठेतून काढता पाय घेते. दुपटीच्या आमिषाने भरलेले आपले पैसे पाण्यात गेले याची जाणीव होईपर्यंत उशीर झालेला असतो, पण एकदा का कंपनी बुडाली की त्यापुढे कोणाचेच काही चालत नाही. असे कित्येक प्रकार तुम्ही ऐकले असतील किंवा तुमच्या आजूबाजूलाही घडले असतील किंवा तुम्ही स्वतःही या प्रकरांना बळी पडला असाल.
तुम्हाला काय वाटतं भ्रष्ट राजकारणी आणि अधिकारी फक्त आपल्याच देशात जन्म घेतात? असे असेल तर हा तुमचा शुद्ध गैरसमज आहे. जगभरातील कितीतरी देश या समस्येने अक्षरश: पोखरले गेले आहेत. आज आम्ही घेऊन आलो आहोत अशाच एका महाभ्रष्टाचाराची गोष्ट! ही गोष्ट आपल्या मायभूमीतील नसून सातासमुद्रापलिकडची आहे.




