'मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते' अशी सुरेश भटांची कविता आहे. त्याच चालीवर 'दिवाळखोरीने केली सुटका, कर्जाने छळले होते' असं म्हणण्याची वेळ श्रीलंकेवर येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
अगदी कालपरवापर्यंत हा देश म्हणजे पर्यटकांसाठी नंदनवन होतं. आज मात्र त्याची रया गेली आहे. एरवी हरतऱ्हेच्या जिनसांची विक्री करणारी सुपर मार्केट्स ओस पडलीयेत. रेस्टॉरंट्स ग्राहकांना जेवायला घालू शकत नाहीयेत. या देशाला सध्या स्वयंपाकाचा गॅस आणि केरोसीन यांची टंचाई भेडसावत आहे. या सगळ्याचं कारण म्हणजे हा देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. हे प्रकरण इतकं हाताबाहेर गेलं आहे, की त्यातून लवकर सुटका होण्याची शक्यता दिसत नाही.






