आजच्या दिवशी म्हणजे १६जुलैला वर्ष १९४५ मध्ये पहाटे साडेपाचच्या सुमारास इतिहासप्रसिद्ध मॅनहॅटन प्रॉजेक्टची निर्मिती असलेल्या पहिल्या अॅटम बॉम्बची न्यू मेक्सिकोच्या अलॅमोगोर्डो येथे सफळ चाचणी करण्यात आली.
दुसरं महायुद्ध चालू होतं. मित्रराष्ट्रांनी वर्ष १९३९ मध्ये युरेनियमपासून बॉम्ब बनवण्याची योजना आखली. त्या मागे दोन मुख्य कारणं होती. एक म्हणजे इटलीहून अमेरिकेत स्थलान्तरित झालेले शास्त्रज्ञ एनरिको फर्मी यांनी अमेरिकन नेव्हीला दिलेली विखंडनीय मूलद्रव्यांपासून सैन्यासाठी अस्त्र बनवण्याची कल्पना. आणि दुसरं म्हणजे त्याच वर्षी प्रसिद्ध संशोधक अल्बर्ट आईन्स्टाईन अनियंत्रित न्युक्लियर चेन रिअॅक्शनद्वारे निर्मिती होऊ शकणार्या अतिसंहारक अस्त्रांच्या निर्मितीच्या सिद्धान्ताला दिलेली मान्यता. लगेच पुढच्या वर्षी म्हणजे १९४० मध्ये रुझवेल्ट सरकारनं ६०००डॉलर्सची देणगी देऊन याबद्दलच्या संशोधनाला मान्यता दिली. पुढं वर्ष १९४२ मध्ये अमेरिकाच दुसर्या महायुद्धात ओढली गेल्यामुळं आणि जर्मनी स्वतःच युरेनियम बॉम्ब बनवत असल्याची खबर आल्यामुळं अमेरिकेच्या युद्धविभागानं या प्रकल्पात जातीनं लक्ष घालायला सुरूवात केली.



