कुठल्याही सार्वजनिक सभेला किंवा कार्यक्रमाला जा, तिथे प्लास्टिकच्या खुर्च्या ओळीने मांडलेल्या असतात. साधीसुधी दिसणारी पण आरामदायी अशी ही मोनोब्लॉक खुर्ची आपण कधी ना कधी तरी नक्कीच वापरलेली असते.
आपल्याकडे या खुर्चीसाठी मोनोब्लॉक हा शब्द फारसा प्रचलित नाही.आपण तिचं नीलकमलची खुर्ची असं सर्रास बारसं करून टाकलंय.वास्तविक सुप्रीम इंडस्ट्रीज,विमप्लास्ट असे इतरही काही ब्रॅंड्स या प्रकारची खुर्ची तयार करतात, पण प्लॅस्टिक उत्पादनांच्या बाजारपेठेत नाव असलेल्या नीलकमलवरून ही खुर्ची अनेक ठिकाणी नीलकमलची खुर्ची म्हणून ओळखली जाते.या प्रकारच्या खुर्चीमध्ये इतर रंग असले तरी जास्त करून आपल्या डोळ्यासमोर पांढऱ्या, ऑफ व्हाईट, फिकट पिवळ्या, किंवा बदामी रंगाची खुर्ची येते. लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत कोणीही सहजपणे इकडून तिकडे ढकलत नेईल अशी ही खुर्ची वजनाला हलकी असली तरी प्रत्यक्षात धातूपेक्षाही मजबूत आहे.





