बंद, मोर्चा, संप, हे शब्द ऐकल्यावर किंवा वाचल्यावर तुमच्या डोळ्यासमोर कुठले चित्र उभे राहते? कुठल्या तरी कारखान्यासमोर गर्दीने उभे असलेले कामगार आणि त्यांच्या घोषणा, हातात आपल्या मागण्यांचे बोर्ड घेऊन उभे असलेल्या अंगणवाडी सेविका, शेतकरी आंदोलक, अशा वेगवेगळ्या व्यवसायक्षेत्रातील कर्मचारी तुमच्या कल्पनेत तुम्ही पाहू शकाल. पण अंतराळात जाऊन अवकाशसंशोधकांनी संप पुकारला आहे असे चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभे राहणार नाही. कारण अशी कधी बातमी तुमच्या वाचनात आलेलीच नाही. पण आज आम्ही तुम्हाला अवकाश संशोधकांच्या अनोख्या संपाचा किस्सा सांगणार आहोत जो १९७३ सालच्या स्कायलॅब ४ या अवकाश मोहिमेत प्रत्यक्षात घडला होता. विशेष म्हणजे जसे सगळ्याच मोर्चेकरी आणि आंदोलकांचे तोंड दाबले जाते, त्यांच्या मागण्या धुडकावून त्यांना जेरीस आणले जाते तसेच काही या मोहिमेतील अंतराळ संशोधकांच्या बाबतीतही घडले होते. वाचा तर मग हा अंतराळातील पहिल्याच संपाचा किस्सा बोभाटावर!
१९७३ साली नासाने स्कायलॅब-फोर नावाची एक अंतराळ मोहीम आखली होती. अंतराळवीर जेरी कार हे या मोहिमेचे प्रमुख होते. त्यांच्यासोबत एडी गिब्सन आणि पायलट विल्यम पोग या ८४ दिवसांच्या मोहिमेचा एक भाग होते. नासाने आखलेल्या या आधीच्या अवकाश मोहिमांमध्ये यांपैकी तिघांपैकी कुणाचाच समावेश नव्हता. तिथेही अवकाश प्रवासात नवखेच होते. ८४ दिवसांच्या या प्रदीर्घ कालावधीसाठी अशा नवख्या संशोधकांना पाठवणे फारसे हिताचे ठरणार नाही, असा सल्ला अनेकांनी दिला असूनही नासा आपल्या भूमिकेवर ठाम राहिली.






