जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे, ही ओळ सार्थक ठरवणारी ब्रायन जॅक्सनची सत्यकथा सध्या जगभर गाजते आहे.
केवळ जबाबदारी टळावी आणि टाळावी या हेतूने ब्रायनला त्याच्या वडीलांनी , तो अकरा महिन्याचा असताना एचहायव्हीबाधित रक्ताचे इंजेक्शन दिले. पण..... ब्रायन जगला.
जगणे सोपे नव्हते. एचआयव्हीमुळे त्याची रोगप्रतिकारक शक्ती क्षीण झाली होती . सतत ताप , यकृताला सूज, हातापायाच्या नखांना बुरशी येणे , अशा रोजच्या त्रासाला सामोरे जाण्यासाठी दिवसाकाठी त्याला तेवीस वेगवेगळी औषधे घ्यावी लागायची. शाळेत तो चेष्टेचा आणि हेटाळणीचा विषय होता. ब्रायन आज विशीत आहे. मजेत आनंदात जगतो आहे. त्याच्या वडीलांना तो कधीच भेटला नाही पण त्याने वडिलांना माफ केले आहे. आयुष्याला कंटाळलेल्या अनेकांसाठी ब्रायन जॅक्सनची ही जीवनगाथा प्रेरणादायी आहे.
