'आपल्याला कळलं नाही म्हणजे आपल्याला वाटतंय तसंच आहे' हा एक छान गैरसमज अनेकदा पाहायला मिळतो आणि मग त्यातून नको तेव्हढी कल्पकता जन्माला येते. सोबत असलेल्या व्हिडीओत एक छोटासा पक्षी एका मोठ्या पक्षाला भरवतोय असं दिसतंय. हा व्हिडीओ बघून लगेच लोकं एका गोंडस निष्कर्षाला येतात. 'बघा, बघा एक तरुण पक्षी आपल्या वृध्द पालकाला भरवून कर्तव्याची पूर्ती करतो आहे ' आता प्रत्यक्षात या भाबड्या समजूतीपलीकडे एक निसर्गाचं जे गमतीदार सत्य दडलं आहे ते आज समजून घेऊ या.
या व्हिडियोत दिसणारा प्रिनिया (वटवट्या) नावाचा छोटासा पक्षी त्याच्यावर लादलेलं पालकत्व अजाणतेपणी निभावतोय.या व्हिडीओत जे दुसरं भलं मोठं धूड आहे ते एका कुकू नावाच्या पक्ष्याचं पिल्लू आहे.म्हणजे आपण वरवर बघता जे समजतोय त्याच्या अगदी उलट चित्र आहे. तो छोटासा पक्षी पालकच आहे आणि जे मोठं धूड दिसतंय ते बाळ आहे. अशा प्रकारे स्वतःचं पिल्लू दुसऱ्याकरवी वाढवण्याला 'ब्रूड पॅरासाईटीझम' म्हणतात. ब्रूड म्हणजे पिल्लावळ. अगदी थोडक्यात सांगायचं तर बांडगुळी पिल्लं.शेवटी काय आहे की अनेकांनी चांगल्या भावनेने हा व्हिडियो शेअर केला असला तरी ते अज्ञानच आहे आणि कुठल्यातरी रुपात बुमरँग बनून आपलंच नुकसान करू शकतं म्हणून हे सत्य तुमच्यासमोर मांडलं आहे.



