शहरं विस्तारू लागली तसतसे पक्ष्यांची निवासस्थानं धोक्यात येऊ लागली. म्हणजे पाहा जे पक्षी आपल्याला १५-२० वर्षांपूर्वी सहज खिडकीतून दिसायचे ते आता दिसत नाहीत. लहान मुलांना चिऊकाऊच्या गोष्टीही सांगू शकत नाही कारण ते चिऊकाऊच दिसणे अवघड झाले. याला उपाय म्हणून उत्तर राजस्थानच्या नागौरमध्ये पक्ष्यांसाठी खास ७ मजली टॉवर उभारला आहे. या अनोख्या उपक्रमाबद्दल आज जाणून घेऊयात.
राजस्थानच्या नागौरमध्ये खास पक्ष्यांसाठी उभारलाय ७ मजली टॉवर! भारतातल्या या पहिल्याच उपक्रमाचे फोटो तर पाहा!!


राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील परबतसर शहरात पक्ष्यांसाठी एक सात मजली टॉवर बांधण्यात आला आहे आणि नुकतेच त्याचे उद्घाटनही झाले. या टॉवरची उंची ६५ फूट आहे. असा पक्ष्यांसाठी बांधलेला देशातील पहिला टॉवर आहे. येथे पक्ष्यांसाठी चोवीस तास अन्न आणि पाणीही उपलब्ध असेल. या ठिकाणी एका भागात कबुतरखाना आधीच चालवला जात आहे. आता हे पक्षीगृह आणखी एक आकर्षण ठरणार आहे. येथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी उद्यान आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रार्थना कक्ष आहे. झाडे असतील तर पक्षी हमखास येतील. म्हणूनच या परिसरात एकूण ४०० झाडे आणि रोपे लावण्यात आली आहेत. त्यांपैकी १०० झाडे अशोकाची आहेत. पक्ष्यांसाठी सात मजले असलेल्या टॉवरच्या उभारणीसाठी एकूण आठ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.

पक्ष्यांचा हा टॉवर अजमेर येथील चंचलदेवी बालदेवी लुणावत ट्रस्टने बांधलेला आहे. ही जमीन काही काही वर्षांपूर्वी दानशूर व्यक्तींनी दान केली होती. या जागेची किंमतचा तब्बल १ कोटी रुपये आहे. ट्रस्टच्या खात्यात जमा केलेल्या एफडीवर बँकेकडून मिळणारे व्याज येथे पक्ष्यांसाठी वापरले जाते.
सध्या अजमेर मंडईतून नागौरच्या कबुतरखान्यात दर महिन्याला चार ते पाचवेळा तांदूळ येतो. या तांदळाची किंमत सुमारे तीन लाख रुपये सांगितली जाते. आता पक्षीगृहाची भर पडल्याने पक्ष्यांसाठी अन्न व पाण्याचा वापरही वाढणार आहे. पक्षीगृहाशिवाय पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी पाण्याचा तलावही बांधण्यात आला आहे. जिथे पक्षी आंघोळ करू शकतात. सुरुवातीची अनेक वर्षे येथे टँकरने पाण्याची व्यवस्था केली जात होती, मात्र आता बोअरिंग ची व्यवस्था करण्यात आली आहे.

नागौरचा कबुतरखाना १४ जानेवारी २०१४ रोजी सुरू झाला होता आणि आता आठ वर्षांनंतर सर्व पक्ष्यांसाठी टॉवर बांधण्यात आले आहे. देशातील हे पहिलेच पक्ष्यांच्या हक्कांसाठी घर असल्याने या उपक्रमाचे कौतुक होत आहे. माणसांना हक्काचे घर हवे म्हणून उंचच्या उंच टॉवर सगळीकडेच उभारले जातात, पण कोणीतरी वेगळा विचार करत पक्ष्यांसाठी टॉवर बांधल्याने याची चर्चा तर होणारच.
शीतल दरंदळे