बाबूजी ज़रा धीरे चलो। बिजली खड़ी यहाँ बिजली खड़ी|| हे गाणं ऐकायला जितकं मजेदार आहे त्याहूनही प्रत्यक्षात वीज कोसळणं हा अनुभव लाखो पटीने भयावह आहे. मान्सूनच्या सुरुवातीच्या दिवसापासून आषाढ महिना संपेपर्यंत विजा कडाडणे आणि कोसळणे हा अपेक्षित निसर्गक्रम आहे. पण गेल्या काही वर्षांत वीज कोसळण्याचे प्रमाण वाढते आहे ही चिंतेची बाब आहे. बोभाटाच्या आजच्या लेखात हाच मुद्दा आपण सविस्तर वाचूया!
दरवर्षी भारतात २५०० लोक वीज अंगावर कोसळल्याने मरण पावतात. सरकारी नोंदीप्रमाणे २०१८ साली २३०० लोकांनी जीव गमावला होता. Lightning Resilient India Campaign ही संस्था भारतातील अशा घटनांचा लेखाजोखा ठेवण्याचा प्रयत्न करते. प्रयत्न करते असे म्हणायचे कारण असे की बिहार -उत्तर प्रदेश सारख्या राज्यात वीज कोसळण्याच्या घटना पुराच्या दरम्यान होत असल्याने काही वेळा खात्रीलायक संख्या कळत नाही. तरीही गेल्या वर्षीपेक्षा हे प्रमाण या वर्षी ३३% जास्त होते.



