कॅमेरा आणि माणसाचे नाते हे काही दशके जुने असले तरी माणसात असलेले शरीरप्रेम जुनेच आहे. आधी पेंटिंग, मग कॅमेरा आल्यावर फोटो असे माध्यम बदलले तरी स्वप्रेमामुळे माणूस नेहमी स्वतःला इतर माध्यमातुन चितारु इच्छित आलेला आहे. यात नवीन भर म्हणजे सेल्फी!! बदलत्या जगाचे हे ही एक मोठे माध्यम म्हणावे असेच आहे. कारण आधी कॅमेरा असो की पेंटिंग, कोणीतरी एकजण सोबत असावा लागत असे.
सेल्फीने मात्र माणसाला आत्मनिर्भर केले. काढला फोन, घेतली सेल्फी असे सध्याचे वातावरण आहे. सेल्फीमुळे स्वप्रेमाला नवा आयाम मिळाला असला तरी सेल्फीमुळे कितीतरी लोकांच्या जीवावरही बेतले आहे. काही असले तरी सेल्फीप्रेम काय संपत नाही आणि ते दिवसेंदिवस वाढतच जाताना आपण पाहत आहोत.
