लहान मुलांना त्यांची खेळणी म्हणजे जीव की प्राण असतात. अगदी खाताना किंवा झोपतानाही ती खेळणी जवळ ठेवायची त्यांना सवय असते. बाहेर कुठे फिरायला निघालो तरी ती खेळणी ते सोबत घेतात. त्या खेळण्यांशी ते गप्पा मारतात आणि जणू एका वेगळ्याच जगात जातात. पण जशी मुलं मोठी होतात तशी खेळणी खेळणं मागे पडतात. पण डोंबिवलीचे रहिवासी सुभाष राव हे आजही वयाच्या ४०व्या वर्षी स्वतः खेळणी बनवतात. ही खेळणी म्हणजे रेल्वेच्या हुबेहूब प्रतिकृती आहेत. त्यांना हा छंद लहानपणापासून आहे आणि आजही ते यात रमतात. आज पाहूया सुभाष राव यांनी आपला छंद कसा जोपासला आहे ते!
डोंबिवलीत राहणाऱ्या सुभाष राव यांना रेल्वेची प्रचंड आवड आहे. लहानपणी त्यांच्या घराच्या खिडकीबाहेर लोकल गाड्या धावताना दिसायच्या. या रेल्वेनी त्यांना प्रचंड भुरळ घातली .त्यामुळे खेळणी असोत, कंपास बॉक्स असोत किंवा शाळेची बॅग असो, त्यात रेल्वे असलीच पाहिजे. त्यांनी अनेक फोटोही जमवले होते. खेळणी विकत घेतानाही ते रेल्वेचे गेम्स विकत घ्यायचे. पण तरीही त्यांना वाटायचे कि खऱ्या रेल्वेसारखे दिसणारे एकही खेळणे नाही. म्हणून त्यांनी स्वतः रेल्वेगाड्या बनवण्यास सुरुवात केली.


