मृगवर्षाव! फक्त एकच शो.. चुकवू नका!

मृगवर्षाव! फक्त एकच शो.. चुकवू नका!

मृगवर्षाव म्हणजे?

दरवर्षी मृगनक्षत्रातून एका विशिष्ट काळात उल्कावर्षाव होतो. त्याला मृगवर्षावही म्हणतात. भारतात आज रात्री - खरंतर उद्या (२२ ऑक्टो.) पहाटे ६:३० पासून वर्षावाला सुरूवात होईल.

मृग नक्षत्र ओळखायचं कसं?

मृग नक्षत्र हे ओळखायला सर्वात सोपं नक्षत्र आहे. तुम्ही आकाशात पाहिले की तुम्हाला अनेकदा तीन तारे सरळ दिसले असतीलच. तर भारतीय कल्पनेनुसार हे तारे व्याधाने (व्याध हा रात्रीच्या आकाशातील सर्वात तेजःपुंज तारा - नोटः शुक्र हा ग्रह आहे.) मारलेला बाण आहेत तर त्याच्या भोवती चार तुलनेने कमी ठळक चार्‍यांचा चौकोन, एका बाजुला असलेलं त्रिकोणी मृगाचे शिर आणि दुसर्‍या बाजूल वक्राकार तार्‍यांनी बनलेली  शेपूट असं मिळून हे मृग नक्षत्र बनते. (पाश्चात्त्य कल्पना वेगळी आहे. मात्र त्याविषयी पुन्हा कधीतरी)

तर या मृग नक्षत्रातून आज (२१ ऑक्टोबर)ला एक गंमत दिसणार आहे. तो म्हणजे उल्का वर्षाव..

हा उल्का वर्षाव या नक्षत्रातून का होतो?
तुम्ही हॅलेचा धुमकेतू ऐकलाय का? अर्थातच शाळेत तो अनेकदा ऐकला असेल. तर ७६ वर्षांनी सूर्यभेटीसाठी येणारा धुमकेतू. तो ज्या मार्गावरून जातो तिथे शेपटीतील काही लहान मोठे दगड, कण सोडत जातो. जेव्हा पृथ्वी त्या कणांजवळ येते तेव्हा ते दगड पृथ्वीकडे खेचले जातात आणि पृथ्वीच्या भेटीला येताना घर्षणाने जळु लागतात. हे इतक्या वेगात होते की आपल्याला केवळ एक प्रकाशमान रेघ दिसते. अशा अनेक कणांच्या अनेक रेषांमुळे आकाशातून वर्षाव होतोय की काय असा भास होतो.

तेव्हा हा नजारा अजिबात दवडू नका. भारतात आज रात्री - खरंतर उद्या (२२ ऑक्टो.) पहाटे ६:३० पासून वर्षावाला सुरूवात होईल मात्र सर्वाधिक वर्षाव २२ तारखेच्या सकाळी ७:३० ते ८:३० दरम्यान होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत रहाणार्‍या लोकांना मात्र त्यांच्या संध्याकाळी ७:३० वाजता (इस्टर्न स्तँडर्ड टाईम) हा वर्षाव बघायला मिळेल. तर युरोपातील लोकांना ऐन रात्री!

तुम्ही भारतात रहात असाल तर खट्टू होऊ नका. नासाने खास लाईव्ह स्ट्रिमिंगची व्यवस्था केली आहे त्याचा लाभ घ्या.

 

हा वर्षाव धोकादायक असतो का?
अजिबात नाही. जरी हजारो कण पृथीव्कडे एकावेळी खेचले जाणार असले तरी त्यातील बहुतांश कण पृथ्वीपर्यंत पोचायच्या आधीच जळून जातात. तेव्हा बिनधास्त आकाशाकडे डोळे लावा आणि या अप्रतिम शो चा आनंद घ्या!