भारतात अवकाशात गेलेल्या लोकांबद्दल मोठा आदर आहे आणि तो असायला पण हवा. अनेक विकसित देशांप्रमाणेच भारताने स्वातंत्र्यानंतर अवकाश तंत्रज्ञानात घेतलेली झेप डोळे दिपवणारी आहे. इतर क्षेत्रांप्रमाणे याही क्षेत्रात महिला मागे नाहीत. भारतात आकाशात गेलेली दोन नावे प्रसिद्ध आहेत. एक म्हणजे राकेश शर्मा आणि दुसरे कल्पना चावला. आजवर आकाशात जाण्याचा मान कल्पना चावलांच्या रूपाने फक्त एकाच महिलेला मिळाला आहे. पण यात आता अजून एक नाव जोडले गेले आहे.
सिरीशा बांदला या अवकाशात जाणाऱ्या दुसऱ्या भारतीय महिला ठरणार आहेत. व्हिएसएस युनिटीच्या ६ अंतराळवीरांसोबत ११ जुलै रोजी बांदला या आकाशाच्या दिशेने झेप घेणार आहेत. संशोधक म्हणून त्या या टीमसोबत काम करणार आहेत. बांदला यांनी स्वतः या गोष्टीची माहिती ट्विटरवरून दिली आहे.


