समुद्र नष्ट झाला तर काय होईल ? जागतिक जल दिनाच्या निमित्ताने हे समजून घेतलंच पाहिजे !!

समुद्र नष्ट झाला तर काय होईल ? जागतिक जल दिनाच्या निमित्ताने हे समजून घेतलंच पाहिजे !!

पृथ्वीच्या एकूण ७०% भागात समुद्र आहे. समजा हा सगळा समुद्र अदृश्य झाला आणि पृथ्वी कोरडी पडली तर ? आजच्या जल दिनाच्या निमित्ताने या प्रश्नावर विचार करणं महत्वाचं आहे भाऊ. आज ज्या प्रकारे माणूस निसर्गाशी खेळत आहे त्यावरून तो दिवस लांब नाही जेव्हा समुद्र खरोखर अदृश्य होईल.

घाबरू नका राव, समुद्र कोरडा पडायला अजून जवळजवळ १०० कोटी वर्ष आहेत. पण समजा तो आज या क्षणाला अदृश्य झाला तर ? मग काय होईल ? माणूस किती दिवस जगू शकेल ? पृथ्वीचं काय होईल ? चला समजून घेऊया....

काही कोटी वर्ष मागे जाऊया. पृथ्वी तयार झाली तेव्हा जवळजवळ सगळी पृथ्वी पाण्याने भरलेली होती. कालांतराने पाणी कमी होऊन भूमी तयार झाली. आज जी पृथ्वी आपण पाहतो ती या प्रकारे तयार झाली आहे. जमीन तयार झाल्यानंतर अनेक वर्षांनी पृथ्वीवर जीव तयार झाला. पाण्याशिवाय हे शक्यच नव्हतं. लहानपणी आपल्याला विज्ञानात शिकवलेलं तुम्हाला आठवत असेल, ‘पहिले जीव हे पाण्यातून आले होते’.

आता वर्तमानात या. पृथ्वीवरच्या एकूण पाण्याच्या ९७% पाणी हे समुद्राचं आहे. उरलेलं ३% पाणी हे नदी, सरोवर आणि जमिनीखाली, तसेच बर्फाच्या रूपाने आहे. समुद्र अदृश्य झालाच तर हे पाणी पृथ्वीला कोरडं होऊ देणार नाही. पण या पाण्याने समुद्राची कमी भरून निघेल का ? तर नाही !!

समुद्र पृथ्वीवरचं हवामान नियंत्रित करण्याचं काम करतं. पाऊस कसा पडतो हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. समुद्रच नसेल तर पाऊस पडणार नाही. आणि पाऊस पडला नाही तर पृथ्वीवरचं ते ३% टक्के पाणी सुद्धा संपेल. समुद्राचं आणखी एक महत्व असं की समुद्र मोठ्या प्रमाणात सूर्याची उष्णता शोषून घेतो. ह्यामुळे पृथ्वीवर तापमान नियंत्रित राहतं. समुद्राचं पाणी नसल्याने सूर्याची किरणं पृथ्वी भाजून काढतील. पुर्थ्वी लवकरच शुक्र ग्रह होऊन बसेल. शुक्रवार पडलेली सूर्याची किरणं मोठ्या प्रमाणात परावर्तीत होतात. पृथ्वीचं पण काहीसं असंच होऊ शकतं.

समुद्र अदृश्य झाल्यावर पहिला फटका हा समुद्रातील जीवांना बसेल. माणसाचं म्हणाल तर माणूस नदी, सरोवर यांच्या पाण्यावर काही दिवस जगेल. शेवटी शेवटी तर बर्फाचाही उपयोग होऊ शकतो, पण हे काही दिवसच. निर्जलीकरण होऊन माणूस पृथ्वीवरून काही दिवसातच नामशेष होईल. पृथ्वीवरचे जास्तीत जास्त प्राणी पण मरतील.

स्रोत

एका आठवड्याच्या आत वनस्पती नष्ट होऊ लागतील. आठवड्याभरानंतर जंगल संपू लागेल. अशी पण शक्यता आहे की पृथ्वीचं तापमान वाढल्याने जंगलांना आग लागेल. ही आग सर्व राख केल्याशिवाय थांबणार नाही.

अखेर एक वर्षाच्या कालावधीत पृथ्वी केवळ मातीचा गोळा बनून सूर्याभोवती फिरत असेल. पाण्याशिवाय पृथ्वीवर कधीच नवीन जीव तयार होणार नाही.

मंडळी, हे एवढं सगळं पाण्याच्या अभावाने घडणार आहे. तुम्हाला समजलंच असेलच की पाणी किती महत्वाचं आहे. आजच्या जागतिक जल दिनाच्या निमित्ताने आपण पाणी वाया घालवणार नाही असं स्वतःशीच ठरवूया. आजच्या आपल्या छोट्या प्रयत्नाने समुद्र नष्ट होण्याचा तो दिवस काही शे वर्षांनी तरी नक्कीच दूर जाईल.