इलेक्ट्रिक वाहनांकडे लोकांचा ओढा वाढत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती बघता ती संख्या वाढत जाणार हे स्पष्टच आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे पर्यावरण रक्षणास होणारी मदत हा देखील अनेकांचा या गाड्या घेण्यामागे हेतू असतो. पण अजूनही चार्जिंग आणि एका चार्जिंगमध्ये गाडी किती किलोमीटर्स जाऊ शकते या विषयामुळे लोक इलेक्ट्रिक वाहन घेण्यासाठी मागेपुढे करतात. खरं पाहायला गेलं तर पुरेशी चार्जिंग स्टेशन्स अजूनही दिसत नाहीत.
चार्जिंग स्टेशन्स अधिकाधिक प्रमाणात वाढावेत अशी अपेक्षा केली जात असताना दोन मुलांनी एक वेगळीच डोक्यालिटी लढवून वायरलेस चार्जिंगचा पर्याय तयार केला आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी येथे शिकणाऱ्या दोन तरुणांनी ही नामी टेक्नॉलॉजी तयार केली आहे. रोहित राजभर आणि सागर कुमार अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत.


