भारतीय संघाने अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya rahane) नेतृत्वाखाली खेळताना २०२०-२१ मध्ये ऐतिहासिक विजय मिळवला होता. युवा भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये (Australia vs India) जाऊन ऑस्ट्रेलिया संघाला कसोटी मालिकेत २-१ ने धूळ चारली होती. या मालिकेत भारतीय संघाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. ॲडीलेड कसोटीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या ३६ धावांवर संपुष्टात आला होता. मालिकेत १-० ने पिछाडीवर असताना विराट कोहली पितृत्व रजा घेत माघारी परतला होता. त्यानंतर मराठमोळ्या अजिंक्य रहाणेला संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. त्याने अप्रतिम नेतृत्व करत भारतीय संघाला जोरदार पुनरागमन करून दिले आणि विजय देखील मिळवून दिला. मात्र सिडनी कसोटी सुरू असताना असे काहीतरी घडले ज्यामुळे या कसोटीत नवा वाद पेटला. (Sydney test)
भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad siraj) आणि जसप्रीत बुमराहवर (Jasprit bumrah) सामना पाहण्यासाठी आलेल्या काही प्रेक्षकांनी वर्णद्वेषी टीका केल्याचे पाहायला मिळाले होते. बीसीसीआयने या घटनेची दखल घेतली आणि त्वरित तक्रार देखील नोंदवली होती. त्यानंतर त्या प्रेक्षकांना मैदानाबाहेर करण्यात आले होते.
नुकताच अजिंक्य रहाणेने 'बंदे मे था दम..' या डॉक्युमेंट्री लॉन्चच्या वेळी सिडनी कसोटीत नेमकं काय घडलं होतं याचा खुलासा केला आहे. त्याने म्हटले की, 'सिडनी कसोटीतील चौथ्या दिवशीही सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचा भारतीय खेळाडूंवर हल्ला सुरूच होता. त्यावेळी मोहम्मद सिराज माझ्याकडे आला आणि मला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मी हे सर्व प्रकरण पंचांना जाऊन सांगितले. मी त्यांना असेही म्हटले जोपर्यंत तुम्ही काही कारवाई करत नाहीत तोपर्यंत आम्ही खेळणार नाही."
तसेच अजिंक्य रहाणे पुढे म्हणाला की, "पंचांनी आम्हाला म्हटले की, तुम्ही खेळ असा मध्ये थांबवू शकत नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही सामना घोषित करू शकता. आम्ही त्यांना म्हटलं की, आम्ही इथे खेळण्यासाठी आलो आहे ड्रेसिंग रूममध्ये बसण्यासाठी नाही. आम्ही त्या वर्णद्वेषी टीका करणाऱ्यांना स्टेडियमबाहेर करण्यावर अधिक भर दिला. सिडनीमध्ये जे झालं ते खूप चुकीचं होतं."
सिडनी कसोटी सामन्यात क्रिकेटसह आणखी खूप काही घडलं मात्र भारतीय संघातील खेळाडूंनी माघार घेतली नाही. त्यांनी संपूर्ण लक्ष सामन्यावर केंद्रित केले. हा सामना अनिर्णीत राहिला होता. तर पुढील सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आणि मालिका २-१ ने आपल्या खिशात घातली. ही मालिका जिंकवून देण्यात रिषभ पंत, हनुमा विहारी, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज,चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने मोलाचे योगदान दिले होते.
