जेव्हा कुंबळेंसमोर पाकिस्तानी फलंदाज झाले हतबल! असा बनला होता ' परफेक्ट १०'चा विक्रम

जेव्हा कुंबळेंसमोर पाकिस्तानी फलंदाज झाले हतबल! असा बनला होता ' परफेक्ट १०'चा विक्रम

भारतीय क्रिकेट चाहते ७ फेब्रुवारी हा दिवस कधीच विसरू शकत नाही. कारण २४ वर्षांपूर्वी याच दिवशी १९९९ रोजी दिग्गज भारतीय गोलंदाज अनिल कुंबळे (Anil kumble) यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा कारनामा केला होता. आजच्याच दिवशी त्यांनी कसोटी क्रिकेटमधील एकाच डावात १० गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. असा कारनामा करणारे ते दुसरेच गोलंदाज ठरले होते. अनिल कुंबळेंपूर्वी हा विक्रम इंग्लंडचा फिरकीपटू जिम लेकरच्या नावे होता. त्यांनी ऑस्ट्रेलिया विरुध्द झालेल्या सामन्यात १० गडी बाद केले होते.

हा सामना ४ जानेवारी ते ८ जानेवारी १९९९ दरम्यान दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमवर पार पडला होता. या सामन्यात त्यांनी २६.३ षटक गोलंदाजी करत, ९ निर्धाव षटकांसह ७४ धावा खर्च करत १० गडी बाद केले होते. या सामन्यात पाकिस्तान संघ ४२० धावांचा पाठलाग करत होता. दरम्यान शाहिद आफ्रिदी आणि सईद अनवर यांनी १०१ धावा जोडूनही पाकिस्तानचा संपूर्ण डाव २०७ धावांवर संपुष्टात आला होता. हा सामना भारतीय संघाने २१२ धावांनी आपल्या नावावर केला होता.

अनिल कुंबळे यांनी या डावात सर्वप्रथम शाहीद आफ्रिदीला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला, पाकिस्तानचे ९ फलंदाज माघारी परतले होते. त्यावेळी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन यांनी अनिल कुंबळे यांना सर्व १० फलंदाज बाद करता यावे यासाठी दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करत असलेल्या जवागल श्रीनाथला ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करण्यास सांगितले. 

अनिल कुंबळे हे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील दिग्गज फिरकी गोलंदाजांपैकी एक आहेत. त्यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीतील १३२ सामन्यांमध्ये ६१९ गडी बाद केले होते. यादरम्यान त्यांनी ३५ वेळेस एकच डावात ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला होता. तर २७१ वनडे सामन्यांमध्ये त्यांनी ३३७ गडी बाद केले होते. २००८ मध्ये ते ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध आपला शेवटचा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले होते.