आजच्याच दिवशी सौरव गांगुलीने 'दादागिरी' करत फ्लिंटॉफची जिरवली होती; वाचा त्या ऐतिहासिक सामन्याबद्दल अधिक..

आजच्याच दिवशी सौरव गांगुलीने  'दादागिरी' करत फ्लिंटॉफची जिरवली होती; वाचा त्या ऐतिहासिक सामन्याबद्दल अधिक..

ओवल मैदानावर मंगळवारी (१२ जुलै) झालेल्या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी इंग्लिश खेळाडूंची चांगलीच जिरवली. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना १२ जुलै हा दिवस चांगलाच लक्षात राहील. मात्र यापूर्वी देखील भारतीय संघाने असा कारनामा सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली केला आहे. आजचा दिवस (On This Day) म्हणजे १३ जुलै देखील भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी अतिशय खास आहे. नेटवेस्ट मालिकेचा तो अंतिम सामना आणि मोहम्मद कैफने विनिंग शॉट मारताच सौरव गांगुलीने जर्सी काढून हवेत फिरवली होती. २० वर्षांपूर्वी झालेला हा सामना आजही अनेकदा पहावसा वाटतो. चला तर जाणून घेऊया या सामन्याबद्दल अधिक माहिती.

युवराज - कैफच्या जोडीने केली होती चमत्कारी खेळी...

आजच्याच दिवशी (On This Day) २० वर्षांपूर्वी भारतीय संघाने लॉर्ड्सच्या मैदानावर चमत्कारी कामगिरी केली होती. नेटवेस्ट मालिकेच्या अंतिम सामन्यात इंग्लंड आणि भारत हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात मोहम्मद कैफ आणि युवराज सिंगच्या जोडीने तुफानी खेळी करत भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. वनडे क्रिकेटच्या इतिहासात या ऐतिहासिक विजयाची नोंद आहे. या सामन्यात मोहम्मद कैफने ७५ चेंडूंमध्ये ८७ धावांची खेळी केली होती. तर युवराज सिंगने ६३ चेंडूंमध्ये ६९ धावांची ६९ खेळी केली होती. या विजयानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाची 'दादागिरी' सुरू झाली होती.

इंग्लंडने ठेवले होते ३२६ धावांचे आव्हान..

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघासमोर ३२६ धावांचे आव्हान ठेवले होते. या सामन्यात नासीर हुसेन आणि मार्कस ट्रेस्कोथिकने शतक झळकावले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघातील ५ फलंदाज १४६ धावांवर माघारी परतले होते. ही कामगिरी पाहून भारतीय चाहते भलतेच निराश झाले होते. अनेकांना वाटले होते की, हा सामना तर गेला. मात्र त्यानंतर युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ नावाचं वादळ आलं. दोघांनी तुफान फटकेबाजी करत इंग्लिश गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. भारतीय संघाने हा सामना २ गडी राखून आपल्या नावावर केला होता. या विजयानंतर सौरव गांगुलीने जर्सी काढून हवेत फिरवली होती.

गांगुली विरुद्ध फ्लिंटॉफ 

सौरव गांगुली हा खूप आक्रमक कर्णधार होता. लॉर्ड्सच्या मैदानावर गांगुलीने आपली जर्सी काढण्यामागचे कारण फ्लिंटॉफ होता. वानखेडे मैदानावर भारतीय संघाचा पराभव केल्यानंतर फ्लिंटॉफने आपली जर्सी काढून हवेत फिरवली होती. याच गोष्टीची परतफेड करत गांगुलीने लॉर्ड्सच्या मैदानावर आपली जर्सी काढून फिरवली होती. हे क्षण क्रिकेट चाहते कधीच विसरू शकणार नाही.