१९८३ साली भारताने क्रिकेटचा वर्ल्डकप जिंकला. त्यावेळी भल्याभल्या मातब्बरांचा भरणा असलेल्या संघांना लोळवून भारताने आपण जगज्जेते असल्याचे सिद्ध केले होते. या वर्ल्डकप विजयाने भारतीय क्रिकेट संघाचा आत्मविश्वास दुणावला होता. याच आत्मविश्वासामुळे भारताने त्याचा पुढचा म्हणजे १९८७ झालेला वर्ल्डकप भारतात आयोजित केला होता. आता तुम्हाला इतके माहीत आहे. पण १९८७ सालचा हा वर्ल्डकप आयोजित करताना मात्र बीसीसीआयची चांगलीच दमछाक झाली होती.
१९८३ साली आपण वर्ल्डकप जिंकल्याने आता भारतीय क्रिकेटला नव्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी १९८७ चा वर्ल्डकप कुठल्याही परिस्थितीत आयोजित करायचाच असा चंग बीसीसीआयने बांधला होता. पण त्यावेळी एकटा भारत वर्ल्डकप आयोजित करू शकेल अशी आर्थिक परिस्थिती नव्हती. त्यासाठी पाकिस्तानला सोबत घेण्यात आले. दोन्ही देश मिळून वर्ल्डकप आयोजित करतील असे ठरले.
इंग्लंडच्या मानाने पाचपट जास्त किंमत देत भारताने हा वर्ल्डकप आयोजित करण्याचे निश्चित करून टाकले. पाकिस्तान आधीच कफल्लक म्हणून भारताने या डीलचा २/३ वाटा उचलला होता. सर्व करून भारताला २० कोटी रुपयांचा खर्च येणार होता. यासाठी या वर्ल्डकपला धीरूभाई अंबानींची रिलायन्स स्पॉन्सर करणार असल्याचेही ठरले होते.


