देश-विदेश फिरायला मिळावा असे कुणाला वाटत नाही? एकदा तरी आपण देशाबाहेर जाऊन बाहेरच्या लोकांचा देश पाहावा, त्यांचे राहणीमान जवळून पाहावे अशी अनेकांची तीव्र इच्छा असते आणि मग काही अतरंगी लोकं आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी काहीतरी भन्नाट कल्पना शोधून काढतात. श्रीलंकेतील काही तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी बाहेर जायचे होते. पण त्यांना परदेशात जाण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे मिळत नव्हती. पण म्हणतात ना इच्छा तेथे मार्ग. तसाच या तरुणांनीही आपला मार्ग शोधला. आता हा मार्ग कोणता होता आणि त्यावर त्यांनी कशाप्रकारे अंमलबजावणी केली हे वाचून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल.
तर ही घटना आहे २००४ सालची. जर्मनच्या टीव्हीएस वीटीसलिंगन स्पोर्ट्स क्लबने देशोदेशीच्या संघाना एका आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी निमंत्रित केले होते. त्यांनी श्रीलंकेलाही त्यांची एखादी टीम या सामन्यांसाठी पाठवण्याची विनंती केली होती. त्यावेळी जर्मनीत होणाऱ्या या सामन्यांमध्ये सहभागी होईल अशी मजबूत व्हॉलीबॉल टीम श्रीलंकेकडे नव्हती. तेव्हा त्यांनी देशातील हॉलीबॉलची आवड असणाऱ्या तरुणांना एकत्र करून एक नवी आंतरराष्ट्रीय टीम बनवण्यास सुरुवात केली.



