Ms Dhoni Birthday: पाहा एमएस धोनीच्या क्रिकेट कारकिर्दीतील काही अविस्मरणीय क्षण ; व्हिडिओ

Ms Dhoni Birthday: पाहा एमएस धोनीच्या क्रिकेट कारकिर्दीतील काही अविस्मरणीय क्षण ; व्हिडिओ

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ७ जुलै या दिवसाला विशेष महत्व आहे. याच दिवशी अशा एका क्रिकेटपटूने जन्म घेतला होता ज्याने पुढे जाऊन भारतीय क्रिकेटचं नशीब पालटलं. आम्ही कोणाबद्दल बोलतोय याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. आम्ही बोलतोय, याची रांची मध्ये जन्म घेतलेल्या महेंद्र सिंग धोनीबद्दल. वनडे विश्वचषक, टी -२० विश्वचषक आणि चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरणारा एकमेव भारतीय कर्णधार. धोनी ७ जुलै रोजी आपला ४१ वा वाढदिवस साजरा करतोय. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून एमएस धोनीवर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. या खास दिवशी आम्ही तुम्हाला एमएस धोनीच्या क्रिकेट कारकिर्दीतील काही खास क्षणाचे व्हिडिओ दाखवणार आहोत, जे  क्रिकेट चाहते विसरू शकत नाही. (Ms dhoni birthday special)

जेव्हा धोनीने केली होती डेल स्टेनची धुलाई (Dale Steyn vs Ms dhoni)

दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज डेल स्टेन हा किती घातक गोलंदाज आहे हे सर्वांनाच माहित आहे. वेगवान स्विंग होणारे चेंडू टाकण्यात हा गोलंदाजाला तोड नव्हती. मात्र धोनी जोरदार फॉर्ममध्ये असताना तो कुठल्याही गोलंदाजाची धुलाई करू शकतो. हेच त्याने डेल स्टेन विरुद्ध देखील करून दाखवलं होतं. आयपीएल २०१५ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरू होता. त्यावेळी शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या डेल स्टेनच्या गोलंदाजीवर एमएस धोनीने २४ धावा ठोकल्या होत्या.

विश्वचषक २०११ मधील विजयी षटकार (Ms Dhoni's World cup winning six)

२ एप्रिल २०११ रोजी एमएस धोनीने षटकार मारून भारतीय संघाला विश्वचषक जिंकून दिला होता. भारतीय संघाला हा विश्वचषक जिंकण्यासाठी तब्बल २८ वर्ष वाट पाहावी लागली होती. त्याने मारलेल्या या ऐतिहासिक षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

कर्णधारांचा कर्णधार 

आयपीएल स्पर्धेतील एक सामना सुरू असताना जेव्हा एमएस धोनी ड्रेसिंग रूममध्ये बसला होता, त्यावेळी कॅमेरामनने  कॅमेरा धोनीकडे फिरवला.  ड्रेसिंग रूमच्या बाहेर भारतीय कर्णधारांचे फोटो लावण्यात आले होते. या फोटोंच्या बाजूला एक फलक लावण्यात आले होते ज्यावर भारतीय कर्णधार असे लिहिले होते. मुख्य बाब अशी की, या फलकाच्या बाजूला एमएस धोनी बसला होता, जो सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एक आहे.

श्रीलंका विरुद्ध १८३ धावांची खेळी (Ms Dhoni's 183 against srilanka)

२००४ मध्ये पदार्पण करणाऱ्या एमएस धोनीने अशी काही खेळी केली होती ज्याची इतिहासात नोंद आहे. जयपूरच्या मैदानावर केलेली १८३ धावांची खेळी ही कुठल्याही यष्टिरक्षक फलंदाजाने केलेली सर्वात मोठी खेळी होती. या खेळी दरम्यान त्याने १० गगनचुंबी षटकार मारले होते.

एमएस धोनीचा रनआऊट (Ms Dhoni's run out) 

टी -२० विश्वचषक २०१६ स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना सुरू होता. शेवटच्या क्षणी बांगलादेश संघाला सामना जिंकण्यासाठी १ चेंडूमध्ये २ धावांची आवश्यकता होती. मात्र हार्दिक पंड्याने ऑफ साईडच्या बाहेर चेंडू टाकला, जो थेट एमएस धोनीच्या हातात गेला. त्याने चेंडू हातात येताच यष्टीला मारण्याचा प्रयत्न नाही केला, तर धावत यष्टीकडे गेला आणि फलंदाजाला रनआऊट केले.  हा इतका वेगवान रनआऊट की फलंदाज क्रीजमध्ये पोहोचलाच नव्हता. भारतीय संघाने हा सामना १ धावेने आपल्या नावावर केला होता.

यापैकी कुठला सामना तुम्ही लाईव्ह पाहिला होता? कमेंट करून नक्की कळवा.