भारतीय संघात खेळण्यासाठी रोज करायचा ६४ किमी इतका प्रवास; पदार्पणाच्या ३ वर्षानंतर बनला हिरो...

भारतीय संघात खेळण्यासाठी रोज करायचा ६४ किमी इतका प्रवास; पदार्पणाच्या ३ वर्षानंतर बनला हिरो...

भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघावर जोरदार विजय मिळवला आहे. ही मालिका भारतीय संघाने २-१ ने आपल्या नावावर केली आहे. अक्षर पटेल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव हे या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. मात्र आज आम्ही ज्या खेळाडूबद्दल बोलतोय,त्याचा या विजयासोबत काही एक संबंध नाहीये. इतकेच काय तर, त्या खेळाडूने या विजयात काहीच योगदान दिले नाहीये. मात्र या खेळाडूचा संघर्ष सर्वांसमोर येणं अतिशय गरजेचं आहे.

आम्ही आज तुम्हाला २३ वर्षांपूर्वीचा किस्सा सांगणार आहोत. त्यावेळी विराट कोहली, रोहित शर्मा कोण आहेत हे कोणालाच माहीत नव्हतं. आम्ही बोलतोय भारतीय संघातील डाव्या हाताचे फिरकीपटू सुनील जोशींबद्दल (Sunil Joshi). 

सुनील जोशी यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करुन केवळ ३ वर्षे झाली होती. १९९६ मध्ये पदार्पण केल्यानंतर ते दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध वनडे सामना खेळत होते. या सामन्यात त्यांनी जे केलं ते त्यांनी यापूर्वी कधीही केलं नव्हतं. या सामन्यात ते आपल्या फिरकी गोलंदाजीच्या जोरावर हिरो ठरले होते.  

दक्षिण आफ्रिका संघाचा डाव ११७ धावांवर आटोपला...

२३ वर्षांपूर्वी झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी कर्णधाराने चेंडू सुनील जोशींच्या हातात दिला. सुनील जोशी गोलंदाजीला येताच दक्षिण आफ्रिका संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. दक्षिण आफ्रिकन फलंदाज त्यांच्या गोलंदाजीवर अक्षरशः नाचताना दिसून आले होते. दक्षिण आफ्रिका संघाचा संपूर्ण डाव अवघ्या ११७ धावांवर संपुष्टात आला होता.

सामन्याचे हिरो ठरले सुनील जोशी..

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी ११८ धावांचे आव्हान मिळाले होते. हे आव्हान सहजरित्या पूर्ण करत भारतीय संघाने विजय मिळवला. मात्र सुनील जोशी यांनी गोलंदाजी करताना केलेल्या कामगिरीचा उल्लेख आजही केला जातो. त्यांनी १० षटक गोलंदाजी करताना ६ निर्धाव षटक टाकले. यादरम्यान त्यांनी केवळ ६ धावा खर्च करत ५ गडी बाद केले होते.

 

सराव करण्यासाठी रोज करायचे ६४ किमीचा प्रवास...

भारतीय संघासाठी खेळण्याचं स्वप्नं बाळगत असलेले सुनील जोशी सराव करण्यासाठी दररोज ६४ किमीचा प्रवास करायचे. त्यांचा जन्म कर्नाटकमध्ये झाला होता. कठोर परिश्रम आणि भारतीय संघात स्थान मिळवण्याची जिद्द काही कमी होत नव्हती. अखेर त्यांना कष्टाचं फळ मिळालं. देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटक संघासाठी चांगली कामगिरी केल्यानंतर त्यांना भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली. त्यांना भारतीय संघासाठी १५ कसोटी आणि ६९ वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर ते प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांची भूमिका पार पाडत आहेत.