आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. २३ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. अवघे ४ आठवडे शिल्लक असताना ज्या गोष्टीची भीती होती, तेच घडलं आहे. भारतीय संघाचा अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे. जसप्रीत बुमराहला स्ट्रेस फ्रॅक्चर झाला आहे. या कारणामुळे तो ५ ते ६ महिने मैदानाबाहेर राहणार आहे. मात्र जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी देखील तो अनेकदा दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, बुमराहच्या पाठीत स्ट्रेस फ्रॅक्चर झाल्यामुळे तो जवळपास ५ ते ६ महिने मैदानापासून दूर राहणार आहे. जसप्रीत बुमराहला ही दुखापत अनेकदा नडली आहे. जेव्हा जसप्रीत बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते, त्यावेळी तो एकदम फिट होता. त्याला कुठलीही दुखापत नव्हती. मात्र गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून त्याला अनेकदा दुखापतीमुळे संघाबाहेर राहावे लागले आहे.
गेल्या ३ वर्षांत ५ वेळेस दुखापतीमुळे संघाबाहेर..
मार्च २०१९ :
जसप्रीत बुमराह आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. या संघाचे प्रतिनिधित्व करताना २०१९ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. ही दुखापत इतकी गंभीर नव्हती. त्याने दुखापतीतून लवकर बरा झाला आणि पुन्हा एकदा खेळण्यासाठी मैदानात उतरला होता.
सप्टेंबर २०१९ :
पहिल्यांदा जेव्हा जसप्रीत बुमराहला पाठीत स्ट्रेस फ्रॅक्चरची समस्या जाणवली होती. त्यावेळी बीसीसीआयने ही दुखापत किरकोळ असल्याचे म्हटले होते. मात्र त्याला बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुध्द झालेल्या कसोटी मालिकेतून बाहेर राहावे लागले होते.
जानेवारी २०२१-
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी तिसऱ्या कसोटी सामन्यातनंतर एबडोमेन स्ट्रेनच्या दुखण्यामुळे तो चौथा कसोटी सामना खेळू शकला नव्हता. या दुखापतीतून सावरल्यानंतर तो इंग्लंड विरुध्द कसोटी मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरला होता.
सप्टेंबर २०२२ :
ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या टी -२० मालिकेत जसप्रीत बुमराहने ६ षटके गोलंदाजी केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या पहिल्या टी -२० सामन्यात तो खेळताना दिसून आला नव्हता.
वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त होणं काही नवीन गोष्ट नाहीये. अनेक दिग्गज गोलंदाजांना दुखापतीमुळे मैदान सोडावं लागलं आहे. आता जसप्रीत बुमराहप्रमाणे अनेक असे गोलंदाज आहेत जे तीनही फॉरमॅटसह दोन महिने चालणारी आयपीएल स्पर्धा खेळतात. त्यामुळे जसप्रीत बुमराहची कारकीर्द धोक्यात आली आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय. त्याला जर फिट राहायचं असेल तर त्याला कुठल्यातरी एका फॉरमॅटमधून निवृत्ती घ्यावी लागेल.
