केवळ टीम डेव्हिड नव्हे तर या खेळाडूंनी देखील केले आहे दोन देशांचे प्रतिनिधित्व...

केवळ टीम डेव्हिड नव्हे तर या खेळाडूंनी देखील केले आहे दोन देशांचे प्रतिनिधित्व...

ऑस्ट्रेलिया संघातील (Austrelian team) अष्टपैलू खेळाडू टीम डेव्हिड (Tim David) सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्याने हैदराबादमध्ये भारतीय संघाविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी -२० सामन्यात तुफानी अर्धशतकी खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५४ धावांची खेळी केली होती. मात्र तरीदेखील ऑस्ट्रेलिया संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. टीम डेव्हिड चर्चेत येण्याचं हे पहिलं मुख्य कारण होतं. तर दुसरं कारण म्हणजे ऑस्ट्रेलिया संघासाठी खेळण्यापूर्वी टीम डेव्हिड सिंगापूर संघासाठी खेळायचा. असं करणारा टीम डेव्हिड हा काही पहिला खेळाडू नाहीये. यापूर्वी देखील असे काही खेळाडू होऊन गेले ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन देशांचे प्रतिनिधित्व केले आहे. चला तर पाहूया कोण आहेत ते खेळाडू.

डर्क नॅनस (Dirk nannes ) :

डर्क नॅनसने ५ जून २००९ रोजी लॉर्ड्सच्या मैदानावर नेदरलँड संघासाठी पदार्पण केले होते. मात्र त्यानंतर तो ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळताना दिसून आला. ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये जन्मलेल्या डर्क नॅनसने सुरुवातीला नेदरलँड संघासाठी क्रिकेट खेळले. त्याने ऑस्ट्रेलिया संघासाठी एकूण १५ टी -२० सामने खेळले. यादरम्यान त्याने २७ गडी बाद केले. तर नेदरलँड संघासाठी खेळलेल्या २ सामन्यांमध्ये त्याला केवळ १ गडी बाद करता आला होता.

व्हॅन डर मर्वे (van der Merwe)

३७ वर्षीय व्हॅन डर मर्वे हा नेदरलँड क्रिकेटमधील गाजलेला क्रिकेटपटू आहे. मात्र अनेकांना ही बाब माहीत नसेल की, नेदरलँड संघासाठी क्रिकेट खेळण्यापूर्वी त्याने दक्षिण आफ्रिका संघाचे प्रतिनिधित्व केले होते. २००९ मध्ये त्याने दक्षिण आफ्रिका संघासाठी खेळताना ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पदार्पण केले होते. या सामन्यात त्याने डेविड हसीला बाद करत माघारी धाडले होते. मात्र त्याला दक्षिण आफ्रिका संघासाठी दीर्घ काळ क्रिकेट खेळता आले नाही. सध्या तो नेदरलँड संघासाठी क्रिकेट खेळतोय. आतापर्यंत त्याने या संघासाठी ३३ टी -२० सामन्यांमध्ये ४०३ धावा केल्या आहेत. यासह ४० गडी देखील बाद केले आहेत. आगामी टी -२० विश्वचषक स्पर्धेत तो या संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसून येणार आहे.

डेव्हिड विसे (David weise) :

डेव्हिड विसे देखील आगामी टी -२० विश्वचषक स्पर्धेत नामिबिया संघासाठी खेळताना दिसून येणार आहे. ३७ वर्षीय डेव्हिड विसेने २०१३ मध्ये दक्षिण आफ्रिका संघासाठी पदार्पण केले होते. या संघासाठी खेळताना त्याने २० सामन्यांमध्ये २४ गडी बाद केले होते. मात्र त्यानंतर त्याने नामिबिया संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता. नामिबिया संघासाठी खेळताना त्याने आतापर्यंत एकूण १६ टी -२० सामन्यांमध्ये १२१.३९ च्या स्ट्राईक रेटने २९५ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजी करताना १४ गडी देखील बाद केले आहेत.

येत्या काही दिवसांत आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत डेव्हिड विसे, व्हॅन डर मर्वे आणि टीम डेविड खेळताना दिसून येणार आहेत.