एका घटनेमुळे संपली क्रिकेट कारकिर्द; विकेटकिपिंगच्या बाबतीत धोनीला ही सोडतो मागे..

एका घटनेमुळे संपली क्रिकेट कारकिर्द; विकेटकिपिंगच्या बाबतीत धोनीला ही सोडतो मागे..

दक्षिण आफ्रिकेचा सर्वात यशस्वी यष्टिरक्षक फलंदाज कोण? असा प्रश्न विचारला तर, एकच नाव समोर येतं ते म्हणजे मार्क बाऊचर(Mark Boucher). अनेकांना एबी डीव्हीलियर्स (Ab devilliers)  सर्वोत्कृष्ट वाटत असेल. मात्र मार्क बाऊचरने यष्टीमागे जे काही केलं आहे, त्यामुळे तो नक्कीच एबी डीव्हीलियर्स पेक्षा दोन पाऊल पुढे आहे. आज मार्क बाऊचर आपला ४६ (३ डिसेंबर,१९७६) वा वाढदिवस साजरा करतोय. १९९७ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. मात्र २०१२ मध्ये यष्टिरक्षण करत असताना, त्याच्यासोबत दुःखद घटना घडली. त्यानंतर तो पुन्हा मैदानावर परतला नाही.

तर झाले असे की, १० जुलै २०१२ रोजी समरसेट आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये सामना सुरू होता. या सामन्यातील ४६ वे षटक टाकण्यासाठी इमरान ताहीर गोलंदाजीला आला होता. त्याने टाकलेल्या चेंडूवर फलंदाजी करत असलेला जर्मल हुसेन त्रिफळाचित होऊन माघारी परतला. मात्र चेंडू यष्टीला धडकताच, बेल्स उडून मार्क बाऊचरच्या डोळ्याला जाऊन लागली. त्यावेळी तो आपल्या क्रिकेट कारकिर्दीच्या शिखरावर होता. मात्र या घटनेनंतर तो पुन्हा कधीच मैदानावर पुनरागमन करू शकला नाही.

मार्क बाऊचर यष्टिरक्षण करत असताना हेल्मेटचा वापर नाही करायचा. इमरान ताहीर फिरकी गोलंदाज असल्यामुळे तो यष्टीच्या अगदी जवळ उभा होता. त्यामुळे अवघ्या काही सेकंदात त्याच्या डोळ्याला बेल्स जाऊन लागली. ही घटना घडल्यानंतर, त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता.

धोनीला देखील तोडता आला नाही विक्रम...

मार्क बाऊचरची क्रिकेट कारकीर्द २०१२ मध्ये संपुष्टात आली. मात्र तरीदेखील कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी (झेल आणि यष्टीचीत) घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. 

तसेच त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने १४७ कसोटी सामन्यांमध्ये ५५५ बळी घेतले आहेत. ज्यामध्ये ५३२ झेल आणि २३ स्टंपिंगचा समावेश आहे. तर जगातील सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमएस धोनीला (Ms Dhoni) देखील मार्क बाऊचरचा विक्रम मोडता आला नाहीये. धोनीने ९० कसोटी सामन्यांमध्ये २९४ बळी घेतले आहेत. यामध्ये २५६ झेल आणि ३८ स्टंपिंगचा समावेश आहे.

सध्या तो दक्षिण आफ्रिका संघासाठी मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडतोय.