Ben stokes retirement: बेन स्टोक्सच्या क्रिकेट कारकिर्दीतील ३ सर्वोत्तम खेळ्या, जे क्रिकेट चाहते कधीही विसरू शकत नाही...

Ben stokes retirement: बेन स्टोक्सच्या क्रिकेट कारकिर्दीतील ३ सर्वोत्तम खेळ्या, जे क्रिकेट चाहते कधीही विसरू शकत नाही...

इंग्लंड संघाचा विस्फोटक अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने (Ben stokes) सोमवारी (१८ जुलै) क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. ज्या वयात खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला शिक्का जमवण्यात गुंतलेले असतात त्या वयात त्याने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयामुळे अनेक क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. त्याच्या आक्रमक फलंदाजी समोर गोलंदाजांना घाम फुटतो. मात्र आता बेन स्टोक्स मंगळवारी (१९ जुलै) आपला शेवटचा वनडे सामना खेळणार आहे. बेन स्टोक्सची निवृत्ती हा इंग्लंड संघासाठी न पचणारे दुःख आहे. यामागील कारण असं की, इंग्लंड संघाला एकमेव विश्वचषक जिंकून देण्यात बेन स्टोक्सने मोलाची भूमिका बजावली होती. इतकेच नव्हे तर त्याने इंग्लंड संघाला विजय मिळवून देण्यात अनेकदा महत्वाची खेळी केली आहे. चला तर पाहूया त्याच्या वनडे कारकिर्दीतील ३ सर्वोत्तम खेळ्या. (Ben stokes retirement)

) न्यूझीलंड विरुद्ध ८४ धावांची खेळी (२०१९ विश्वचषक , अंतिम सामना

जर बेन स्टोक्सच्या सर्वोत्तम खेळीबद्दल बोलायचं झालं तर, २०१९ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील खेळी सर्वोत्तम स्थानी असेन. त्यावेळी त्याने दाखवून दिलं होतं की, कठीण परिस्थितीत फलंदाजी कशी करतात. अंतिम सामन्यात इंग्लंड संघ २४२ धावांचा पाठलाग करत होता. अवघ्या ८४ धावांवर ४ इंग्लिश फलंदाज माघारी परतले होते. इथून जोस बटलर आणि बेन स्टोक्सने मोर्चा सांभाळला आणि इंग्लंडला विजयाच्या दिशेने नेलं. बटलर परतला मात्र स्टोक्स शेवटपर्यंत टिकून राहिला आणि इंग्लंड संघाला विजय मिळवून दिला. त्याने या सामन्यात ८४ धावांची खेळी केली होती.

२) भारतीय संघाविरुद्ध ९९ धावांची खेळी (२०२१)

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात इंग्लंड संघाला विजयासाठी ३३७ धावांची आवश्यकता होती. या धावांचा पाठलाग करताना रॉय आणि बेअरस्टो यांनी चांगली सुरुवात करून देत ११० धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या बेन स्टोक्सने भारतीय गोलंदाजांची धुलाई करायला सुरुवात केली. त्याच्या तुफानी खेळीच्या जोरावर इंग्लंड संघाने ४० चेंडू शिल्लक ठेवून सामना जिंकला. केवळ १ धावेमुळे त्याचे शतक हुकले.

३) पाकिस्तान विरुद्ध नाबाद ७१ धावा (२०१९)

बाबर आजमच्या शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटक अखेर ३४० धावा केल्या होत्या. वनडेमध्ये ३४० धावांचा पाठलाग करणं खूप कठीण आहे. या धावांचा पाठलाग करताना जेसन रॉय आणि जेम्स विंसने पहिल्या विकेटसाठी ९४ धावा जोडल्या होत्या. ज्यावेळी स्टोक्स फलंदाजीला आला त्यावेळी इंग्लंड संघ अडचणीत होता. त्याने ६४ चेंडूंमध्ये ७१ धावांची खेळी केली. शेवटी ३ चेंडू शिल्लक असताना इंग्लंड संघाने विजय मिळवला.

 बेन स्टोक्सच्या वनडे कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने २०११ मध्ये आयर्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात पदार्पण केले होते. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणारा सामना हा त्याच्या वनडे कारकिर्दीतील शेवटचा सामना असणार आहे. त्याने आतापर्यंत एकूण १०४ वनडे सामने खेळले आहेत. ज्यात त्याने ३९.४४ च्या सरासरीने २९१९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३ शतके आणि २१ अर्धशतके झळकावली आहेत.