अभिमानास्पद!! २४ वर्षीय निखत झरिनने पटकावला वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपचा किताब

अभिमानास्पद!! २४ वर्षीय निखत झरिनने पटकावला वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपचा किताब

भारतीय महिला बॉक्सर निखत झरीनने (Nikhat zareen) गुरुवारी (१९ मे) ५२ किलोग्रॅम वजनी गटात विश्व विजेता होण्याचा मान पटकावला आहे. २४ वर्षीय निखत जरीनने इंस्तबुल येथे आयोजित करण्यात आलेल्या वुमेन्स वर्ल्ड चॅम्पियनशिप (Women's World championship) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात थायलंडच्या जिटपोंगला जुटामसला पराभूत केले. तिने अंतिम सामन्यात अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत ५-० ने विजय मिळवला.

या विजयासह निखत जरीन बॉक्सिंग विश्वात विश्वविजेता होण्याचा मान पटकावणारी ५ वी भारतीय बॉक्सर ठरली आहे. यापूर्वी विक्रमी ६ वेळेस (२००२, २००५,२००६,२००८,२०१०,२०१८) विश्वविजेत्या होण्याचा मान एमसी मेरी कोमने पटकावला होता. तर सरिता देवी(२००६) आणि जेनी आरएलने (२००६) देखील हा पराक्रम केला आहे.

तेलंगणाच्या २४ वर्षीय झरिनने वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सुवर्ण पदकाची कमाई केली. तर ५७ किलोग्रॅम वजनी गटात मनीषा मोन आणि ६३ किलोग्रॅम वजनी गटात परवीन हुड्डाने कांस्य पदकाची कमाई केली. भारताकडून १२ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.