ऑलिंपिक्स सुरू होण्यापूर्वी यात सोहळ्यात असणार्या खेळांची माहिती वाचूया:
ऑलिंपिक २०१६: बोभाटा ऑलिंपिक गाइड भाग 3


फुटबॉल (Football)
जगात सर्वात लोकप्रिय असणाऱ्या या खेळाविषयी, त्याच्या नियमांविषयी वगैरे अधिक लिहायची आवश्यकता नाही. त्यात यंदाचे ऑलिंपिक्स खेळ फुटबॉलच्या मक्केत ब्राझिलला होत असल्याने यावेळच्या खेळांची मजाच काही और असेल. आपल्याकडे गोवा व बंगालमध्ये फुटबॉलवेड प्रचंड असले तरी आपला संघ अजून एकदाही ऑलिंपिकसाठी पात्र ठरू शकला नाहीये. या खेळाचे नियम सगळ्यांनाच माहित असतात. मात्र तरीही एक उल्लेख करण्यासारखा वेगळा नियम म्हणजे प्रत्येक पात्र संघाच्या बहुतांश खेळाडूंचे वय हे २३ च्या वर असू शकत नाही. एका पुरूष संघात केवळ ३ खेळाडूंचे वय २३ च्या वरचे असण्यास अनुमती आहे.स्त्रियांच्या संघाला वयाचे बंधन नाही. शिवाय प्रत्येक खंडासाठी स्वतंत्र निवड फेऱ्या असल्याने जगभरातून अनेक प्रसिद्ध देशांना पात्रही होता येत नाही (जसे यंदा स्पेन, फ्रान्स इत्यादी दिग्गज पुरूष संघांना पात्र होता आले नाही). तर कित्येक अपरिचित देश खेळताना दिसतात (जसे यंदा फिजी खेळणार आहे).
पुरुषांची स्पर्धा चार गटात तर स्त्रियांची तीन गटात खेळवली जाईलः
पुरुषः
गट अ: ब्राझिल, साऊथ आफ्रिका, इराक, डेन्मार्क
गट बः स्वीडन, कोलंबिया, नायजेरिया, जपान
गट कः फिजी, साऊथ कोरीया, मेक्सिको, जर्मनी
गट ड: होन्डुरास, अल्जेरिया, पोर्तुगाल,अर्जेंटिना
स्त्रिया
गट इ: ब्राझिल, चीन, स्वीडन, दक्षिण आफ्रिका
गट फः कॅनडा, ऑस्ट्रेलिया, झिब्बाब्वे, जर्मनी
गट गः अमेरिका, फ्रान्स, न्युझीलंड, कोलंबिया
या प्रकारात १ स्त्रियांचे व १ पुरुषांचे सुवर्णपदक पणाला असेल
स्पर्धा कुठे होणार?: सात वेगवेगळ्या मैदानात या स्पर्धा होणार आहे. व सारी मैदाने स्पर्धेसाठी सज्ज झाली आहेत.
स्पर्धा कधी होणारः सदर स्पर्धा ०३ ऑगास्टपासून सुरू होतील. व पदक २० ऑगस्टला प्रदान होईल
यावेळी भारताकडून कोण?
अपात्र/संघ उपलब्ध नाही
यावेळी भारताला पदकाची आशा?
गैरलागू

गोल्फ
१९०४ नंतर पहिल्यांदाच ऑलिंपिक्समध्ये गोल्फ या खेळाचा समावेश केला गेला आहे. गेल्या दोन ऑलिंपिक्समध्ये हा खेळ समाविष्ट असावा म्हणून जगभरातून दबाव होता, पण त्याला मान्यता मिळत नव्हती ती यंदाच्या ऑलिंपिकला मिळाली आहे. जगातील वाढते शहरीकरण लक्षात घेता हिरवळ राखणार्या या खेळाला प्राधान्य देऊन योग्य तो संदेश जाईल असे ऑलिंपिक मंडळाला वाटते.
यात २ सुवर्णपदके पणाला लागलेली असतील. एक स्त्री गटासाठी तर दुसरे पुरुषांसाठी
यावेळी भारताकडून कोण?
या खेळासाठी भारताचे तीन खेळाडू क्वालिफाय झाले आहेत.
अनिर्बन लाहिरी, शिव चौरसिया हे दोघे पुरुष गटात तर अदिती अशोक ही महिला गटात आपले नशीब आजमावेल.
यावेळी भारताला पदकाची आशा?
अनिर्बन जरी चांगला खेळाडू असला तरी त्याला पदकाची आशा नाही. इतर दोघे तसे नवखे आहेत. ऑलिंपिकमध्ये निवड होणे हीच मोठी गोष्ट आहे.

जिमनॅस्टिक्स (Gymnastics- Artistic आणि Rhythmic)
जिमनॅस्टिक्समध्ये दोन प्रकार असतात Artistic आणि Rhythmic. यांना वेगळा क्रीडाप्रकार म्हणून गणले जात असले तरी इथे आपण त्यांचा एकत्रच विचार करणार आहोत. हे दोन क्रीडाप्रकार मिळून तब्बल १६ सुवर्णपदके पणाला लागलेली असतात.
आर्टिस्टिकः या प्रकारात १४ सुवर्णपदके प्रदान होतात. प्राचीन ग्रीसपासून लोकप्रिय असणार्या या स्पर्धांमध्ये शक्ती आणि लवचिकता या दोन्ही गुणांची पारख होते. या खेळात जजेसचा चमू गुण प्रदान करतो. गुण देतेवेळी काठिण्यपातळी, प्रदर्शित केलेल्या खेळातील प्रत, शक्ती(Strength), लवचिकता आणि बॅलन्स या कसोट्यांवर गुण दिलेजातात. सर्व जजेसच्या गुणांच्या बेरजेवरून क्वालिफिकेशन आणि पदक ठरते.
रिदमिक या प्रकारात २ सुवर्णपदके प्रदान होतात. या स्पर्धांमध्ये लालित्य आणि सौंदर्याची पखरण असते. यात स्पर्धक संगीताच्या तालावर आणि हूप, बॉल, क्लब्ज आणि रिबिनीचा वापर करून आपले कसब प्रदर्शित करतात. या खेळातही जजेसचा चमू गुण प्रदान करतो. गुण देतेवेळी काठिण्यपातळी, कलात्मकता आणि प्रदर्शन (Execution) या कसोट्यांवर गुण दिले जातात. सर्व जजेसच्या गुणांच्या बेरजेवरून क्वालिफिकेशन आणि पदक ठरते.
यावेळी भारताकडून कोण?
१९६४नंतर पहिल्यांदाच या खेळात एका भारतीयाने प्रवेश मिळावला आहे. 'दिपा करमरकर' हीने आपला दर्जेदार खेळ राखत ऑलिंपिक पात्रता मिळवणार्या पहिल्या भारतीय महिलेचा मान पटकावला आहे.
यावेळी भारताला पदकाची आशा?
दिपा करमरकर उत्तम खेळाडू आहे. २०१४च्या राष्ट्रकुल खेळात तसेच २०१५च्या आशियायी खेळात तिने ब्रॉन्झ पटकावले आहे. पण या दोन्ही स्पर्धांमध्ये अनेक स्कँडेनेव्हियन देश, दक्षिण अमेरिकन देश किंवा अमेरिका सहभागी नसतात. त्यामुळे दिपाकडून यावेळी पदकाची अपेक्षा करणे घाईचे होईल. पण ती प्रतिस्पर्ध्यांना चांगली लढत देईल हे नक्की
हँडबॉल(Handball)
नावात म्हटल्याप्रमाणे बॉल हातात घेऊन खेळायचा हा खेळ आहे. इन्डोअर बॉलगेम्समधे याचे कोर्ट सगळ्यात मोठे असते. यातही फुटबॉलप्रमाणे दोन गोल असतात व गोलकीपर्स त्यांचे रक्षण करत असतात. गोलकीपर्सच केवळ गोलभोवती थांबू शकतो. तर विरुद्ध संघाचे खेळाडू हाताने (तुलनेने) लहान बॉल फेकून गोल करतात. गोल करताना जाळ्याजवळ असल्यास खेळाडूला हातातला बॉल पाय टेकायच्या आत जाळ्यात भिरकावावा लागतो. बॉल ड्रिबल करणे अथवा पास करणे अपेक्षित असते. (अमेरिकन फुटबॉलप्रमाणे)बॉल घेऊन पळण्यास प्रतिबंध असतो.
हाताने खेळल्यावर अर्थातच बरेच जास्त गोल होतात. दर मॅचमध्ये साधारण ५०हून अधिक गोल्स होतात. उत्साहाने भरलेल्या या मॅचेस ३० मिनिटांच्या दोन सत्रात खेळले जातात.
या प्रकारात १ स्त्रियांचे व १ पुरुषांचे सुवर्णपदक पणाला असेल
यावेळी भारताकडून कोण?
अपात्र/संघ उपलब्ध नाही
यावेळी भारताला पदकाची आशा?
गैरलागू
ज्युडो (Judo)
या स्पर्धा विविध वजनी गटांत तसेच महिला व पुरूष अश्या खेळवल्या जातात. सर्व मिळून यात एकूण १४ सुवर्णपदके पणाला लागलेली असतील. यातील स्पर्धकांना 'ज्युदोका' म्हटले जाते. दोन ज्युदोका समोरासमोर येतात व समोरच्याला 'पटकून' किंवा 'पकडून' खेळला जातो. ही स्पर्धा जास्तीत जास्त पाच मिनिटे खेळली जाते व ज्याला सर्वाधिक गुण मिळतात तो जिंकतो. पकडणे, पटकणे, अडकवणे वगैरेसाठी गुण दिले जातात. यात 'इप्पॉन' नावाचा प्रकार असतो तो केल्यास स्पर्धकास थेट विजयी घोषित केले जात. हा इप्पॉन करण्यासाठी एका स्पर्धकाने दुसऱ्याला आधी पटकावे मग पकडावे आणि हात/पायात अडकवावे लागते.
या स्पर्धा प्रत्येक वजनी गटात 'नॉक-आऊट' पद्धतीने खेळवल्या जातील.
यावेळी भारताकडून कोण?
९० किलो वजनी गटात अवतार सिंग आशियायी कोट्यातून पात्र ठरला आहे
यावेळी भारताला पदकाची आशा?
जागतिक पटलावर ७९व्या स्थानावर असणाऱ्या अवतार सिंगकडून पदकाची अपेक्षा करता येऊ नये.
आधुनिक पंचकर्म ;) (Modern Pentathlon)
एकाच खेळाडूच्या विविध खेळातील कौशल्य अजमावणारी ही अनोखी स्पर्धा आहे. यात एकाच खेळाडूला पाच वेगवेगळ्या क्रीडाप्रकारातील कौशल्य दाखवावे लागते. यातील सारे खेळ एकाच दिवशी खेळले जातात, सुरवात तलवारबाजीने होते. ज्यात स्पर्धकाला इतर प्रत्येका बरोबर तलवारबाजी करून गुण मिळवावे लागतात. त्यानंतर २०० मी फ्रीस्टाईल स्विमिंग व त्यानंतर १२ अडथळे असलेला ट्रॅक घोडेस्वारी करून पार करावा लागतो. यातील प्रत्येक स्पर्धेला गुण दिले जातात.
या तीन स्पर्धांनंतर गुणांची बेरीज होते व त्याला टाइम हँडिकॅप मध्ये परिवर्तित केले जाते. हा हँडिकॅप शेवटचा (एकत्रित) चरण सुरू करण्याची वेळ दर्शवतो. या चरणात खेळाडूला ७० सेकंदात पाच लक्ष्यांचा वेध घ्यावा लागतो व १०००मी पळावे लागते, हे सारे तीनदा करावे लागते व जो हे करून अंतिम रेषा पहिल्यांदा ओलांडतो त्याला विजेता घोषित केले जाते.
या प्रकारात १ स्त्रियांचे व १ पुरुषांचे सुवर्णपदक पणाला असेल.
यावेळी भारताकडून कोण?
अपात्र
यावेळी भारताला पदकाची आशा?
गैरलागू
रोइंग या प्रकारात एकेकट्या पासून ते आठ जणांच्या चमूपर्यंतच्या रोइंगच्या स्पर्धा होतात. या व्यतिरिक्त काही अल्पवजनी स्पर्धा (lightweight events) देखील होतात, ज्यात होडीच्या वजनावर त्यावरील खेळाडूंच्या प्रमाणात बंधने येतात. ही स्पर्धा प्रत्येक प्रकारात 'शर्यत' स्वरूपात खेळवली जाते. अंतिम फेरीच्या शर्यतीमधील पहिल्या तीन स्पर्धकांना / गटांना पदके दिली जातात.
या क्रीडाप्रकारात तब्बल १४ पदके पणाला लागलेली असतील
यावेळी भारताकडून कोण?
आपल्या महाराष्ट्राचा दत्तू भोकानल हा एकमेव खेळाडू भारतातर्फे या खेळात पात्र ठरला आहे
यावेळी भारताला पदकाची आशा?
भारतीय रोअर्स आता सलग पाचव्यांदा पात्र होत आहेत. मात्र त्यांच्यात प्रगती इतकीही झालेली नाही की ते पदक जिंकू शकतील.
नौकानयन (Sailing)
दहा (१०) पदके मिळवून देऊ शकणाऱ्या या क्रीडाप्रकारात नौकानयनांच्या शर्यती न होता प्रत्येक स्पर्धेच्यावेळी पहिला आलेल्यास १ गुण, दुसरा आलेल्यास २ अशा प्रकारे गुण दिले जातात. शेवटच्या फेरीत - ज्याला मेडल राउंड म्हणतात- हे गुण दुप्पट करून दिले जातात.
शेवटी ज्या संघाचे गुण सर्वात कमी असतील तो संघ जिंकतो.
या प्रकारात ५-५ पदके महिला व पुरूष संघांना पटकावता येतील.
यावेळी भारताकडून कोण?
अपात्र/संघ उपलब्ध नाही
यावेळी भारताला पदकाची आशा?
गैरलागू