फ्री स्टाईल कुस्तीमध्ये नेहमीच भारतीय कुस्तीपटूंचा दबदबा पाहायला मिळाला आहे. मात्र ग्रिको रोमनमध्ये (कुस्ती प्रकार) भारतीय पैलवानांना हवी तशी कामगिरी करता आलेली नाहीये. मात्र नुकताच सुरू असलेल्या अंडर -२३ वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत, कोट्यावधी भारतीयांची मान अभिमानाने उंचावेल अशी बातमी समोर आली आहे. भारतीय पैलवान साजन भानवालाने ७७ किलोग्रॅम वजनी गटात भारताला कांस्यपदक मिळवून दिले आहे.
साजन भानवालाने अंडर २३ वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळवून दिले होते. या युवा कुस्तीपटूने रेपेचेज फेरीत युक्रेनच्या दिमित्रो वास्तस्कीचा पराभव करत ऐतिहासिक पदक जिंकले. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) आपल्या ट्विटरद्वारे साजनच्या पदक जिंकल्याची माहिती दिली.
अशी होती पदक मिळवण्याची वाटचाल..
साजनने पहिल्या फेरीत लिथुआनियाच्या अस्टिस लिआग्मिनासचा ३-० ने धुरळा उडवला. त्यानंतर प्री-क्वार्टर फायनलमध्ये त्याला मोल्दोव्हाच्या अलेक्झांडरिन गुटूकडून ०-८ ने पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात विजय मिळवत गुटूने अंतिम फेरीत प्रवेश केला. तर साजनला रिपेचेज खेळण्याची संधी मिळाली. या संधीचा दोन्ही हातांनी स्वीकार करत साजनने भारताला ऐतिहासिक पदक मिळवून दिले.
साजनला घडविण्यात वडिलांचे मोलाचे योगदान...
साजन कसांडी या भारतातील छोट्याशा गावात राहतो. त्याचे वडील शेती करतात. साजनची कुस्ती खेळण्याची जिद्द पाहून त्याला वडिलांनी देखील होईल तितकी मदत केली. साजन हा कासंदी गावचा रहिवासी असून त्याचे वडील महिपाल हे शेतकरी आहेत. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती आणि त्यामुळे वडिलांना आपल्या मुलाच्या करिअरसाठी इतरांकडून पैसे घ्यावे लागले.
त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, "देशातील अनेक असे खेळाडू आहेत जे देशाची शान वाढवत आहेत. त्यामुळे मी देखील साजनला खेळाडू बनवण्याचा निर्णय घेतला. मला माहित नाही तो इथपर्यंत कसा पोहोचला. नक्कीच त्याने भरपूर मेहनत घेतली आहे. मी त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र आमची परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे मी इतरांकडून पैसे घेतले. त्याच्या प्रशिक्षकांनी देखील खूप मेहनत घेतली आहे.
