टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. या स्पर्धेच्या दृष्टीने भारतीय संघाने सराव करायला देखील सुरुवात केली आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाविरुद्ध होणार आहे. २३ ऑक्टोबर रोजी होणारा हा सामना हाय व्होल्टेज सामना असणार यात काहीच शंका नाहीये. दरम्यान आज आम्ही तुम्हाला पाकिस्तान संघातील ५ खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांच्याकडून भारतीय संघाला या मोठ्या सामन्यापूर्वी सावधगिरी बाळगावी लागेल.
मोहम्मद रिजवान (Mohammad Rizwan) :
पाकिस्तान संघाचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवान सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. याच कामगिरीच्या बळावर त्याने आयसीसी टी -२० फलंदाजांच्या यादीत पहिले स्थान मिळवले आहे. गतवर्षी झालेल्या टी -२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात मोहम्मद रिजवानने तुफानी खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर त्याने पाकिस्तान संघाला १० गडी राखून विजय मिळवून दिला होता. त्यामुळे भारतीय संघाला मोहम्मद रिजवान कडून सावध राहावं लागेल.
बाबर आजम (Babar Azam) :
पाकिस्तान संघाचा कर्णधार आणि तीनही फॉरमॅटमध्ये टॉप फलंदाजांच्या यादीत असलेला बाबर आजम देखील चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. भारतीय संघाला बाबर आजम कडून देखील सावधगिरी बाळगावी लागणार आहे. गतवर्षी भारतीय संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने मोहम्मद रिजवान सोबत मिळून अप्रतिम फलंदाजी केली होती. यावेळी देखील त्याची बॅट तळपली तर भारतीय संघाच्या अडचणीत वाढ होऊ शकते.
शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) :
पाकिस्तान संघातील वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुखापतीमुळे संघाबाहेर झाला होता. मात्र तो आगामी टी -२० विश्वचषक स्पर्धेत पुनरागमन करणार आहे. तो सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने अनेक फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवले आहे. २०२१ मध्ये झालेल्या टी -२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरचे कंबरडे मोडले होते. त्यामुळे यावेळी देखील भारतीय फलंदाजांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे.
नसीम शाह (Naseem Shah) :
पाकिस्तान संघाचा युवा वेगवान गोलंदाज नसीम शाहने आशिया चषक २०२२ स्पर्धेत जोरदार कामगिरी केली होती. त्याने आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती. त्याचे स्विंग होणारे चेंडू फलंदाजांना अडचणीत टाकत होते. त्यामुळे भारतीय संघाला नसीम शाह विरुध्द खेळताना देखील सावध राहावं लागणार आहे.
मोहम्मद नवाज (Mohammad Nawaj) :
पाकिस्तान संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नवाज देखील भारतीय संघाच्या अडचणीत वाढ करू शकतो. आशिया चषक स्पर्धेत त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीने देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आतापर्यंत खेळलेल्या ४६ टी -२० सामन्यांमध्ये त्याने ४२ गडी बाद केले आहेत.
काय वाटतं? या खेळाडूंपैकी कुठला खेळाडू भारतीय संघासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो? कमेंट करून नक्की कळवा.
