भारताने २-१ ने उडवला ऑस्ट्रेलियाचा धुव्वा! पाहा मालिकेतील टॉप -५ फलंदाज अन् गोलंदाज...

भारताने २-१ ने उडवला ऑस्ट्रेलियाचा धुव्वा! पाहा मालिकेतील टॉप -५ फलंदाज अन् गोलंदाज...

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) या दोन्ही संघांमध्ये नुकताच ३ टी -२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील अंतिम सामना हैद्राबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ६ गडी राखून विजय मिळवत मालिका २-१ ने आपल्या नावावर केली आहे. ऑस्ट्रेलिया संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर ७ गडी बाद १८६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने हे लक्ष्य सहजरित्या पूर्ण केले. दरम्यान आम्ही तुम्हाला या मालिकेतील टॉप -५ फलंदाज आणि टॉप -५ गोलंदाज कोण आहेत याबाबत माहिती देणार आहोत.

भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल (Axar patel) या मालिकेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला. तो या मालिकेत भारतीय संघाकडून सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला. त्याने मोहालीच्या मैदानावर झालेल्या सामन्यात १७ धावा खर्च करत ३ गडी बाद केले होते. तर नागपूरच्या मैदानावर १३ धावा खर्च करत २ आणि अंतिम सामन्यात ३३ धावा खर्च करत ३ गडी बाद केले. त्याने या ३ सामन्यांमध्ये ६३ धावा खर्च करत ८ गडी बाद केले. याच कामगिरीच्या जोरावर त्याला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतील टॉप - फलंदाज...

या मालिकेतील ३ सामन्यांमध्ये ११८ धावा करणारा कॅमरन ग्रीन सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने या मालिकेत दोन अर्धशतक झळकावले. तर ११५ धावा करत भारतीय संघातील फलंदाज सूर्यकुमार यादव या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तसेच १०५ धावांसह हार्दिक पंड्या या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.

कॅमरन ग्रीन - ११८ धावा

 सूर्यकुमार यादव- ११५ धावा

 हार्दिक पंड्या - १०५ धावा

 मॅथ्यू वेड - ८९ धावा

 विराट कोहली - ७६ धावा

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतील टॉप - गोलंदाज..

या मालिकेत अक्षर पटेलने ऑस्ट्रेलिया संघातील फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवून ठेवलं होतं. एकीकडे इतर गोलंदाज धावा खर्च करत होते, तर अक्षर पटेल धावा वाचवून गडी देखील बाद करत होता. त्याने या मालिकेत ८ गडी बाद केले. त्यानंतर नॅथन एलिस, ऍडम झांपा आणि जोश हेझलवुड यांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले.

अक्षर पटेल - ८ गडी

 नॅथन एलिस - ३ गडी

 ॲडम झांपा - ३ गडी

 जोश हेझलवूड - ३ गडी 

 युझवेंद्र चहल- २ गडी

ऑस्ट्रेलिया संघाला धूळ चारल्यानंतर आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिका संघासोबत दोन हात करताना दिसून येणार आहे. येत्या २८ सप्टेंबर पासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी -२० मालिकेला प्रारंभ होणार आहे.