प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील ८ व्या हंगामाचा शेवटचा टप्पा सुरू आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना शुक्रवारी (२५ फेब्रुवारी) पार पडणार आहे. या सामन्यात जेतेपद मिळवण्यासाठी पटना पायरेट्स आणि दबंग दिल्ली हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने येणार आहेत. या दोन्ही संघांनी आतापर्यंत या स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. पटना पायरेट्स संघाने २३ पैकी १७ सामन्यात विजय मिळवला आहे. तर दबंग दिल्ली संघाला २३ पैकी १३ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. पटना संघाने आतापर्यंत या स्पर्धेत जोरदार कामगिरी केली असली तरी देखील त्यांचा एकही चढाईपटू सर्वाधिक गुणांची कमाई करण्याच्या यादीत टॉप - ५ मध्ये नाहीये. चला तर पाहूया कोण आहेत ते ५ चढाईपटू.
पवन शेरावत :
प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या ८ व्या हंगामात पवन शेरावतने जोरदार सुरुवात केली होती. या हंगामात ३०० पेक्षा अधिक गुणांची कमाई करणारा तो एकमेव चढाईपटू आहे. त्याने आतापर्यंत या हंगामात ३०४ गुणांची कमाई केली आहे.
अर्जुन देशवाल :
या हंगामात जयपूर पिंक पँथर्स संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही. परंतु याच संघातील चढाईपटू अर्जुन देशवालने आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. अर्जुन देशवालने या हंगामात एकूण २२ सामने खेळले आहेत ज्यामध्ये त्याने आतापर्यंत एकूण २६७ गुणांची कमाई केली.
मनिंदर सिंग :
मनिंदर सिंग यावेळी देखील चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे पाहायला मिळाले होते. त्याचा संघ देखील प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकला नाही. त्याने या हंगामात एकूण २२ सामने खेळले, ज्यामध्ये त्याने २६२ गुणांची कमाई केली.
नवीन कुमार :
नवीन कुमार हा प्रो कबड्डी स्पर्धेच्या इतिहासातील एकमेव खेळाडू आहे ज्याने सलग २८ वेळेस सुपर १० करण्याचा पराक्रम केला आहे. त्याच्या या हंगामातील कामगिरी बद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत एकूण १६ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने १९६ गुणांची कमाई केली आहे. पटना विरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यात ४ गुणांची कमाई करताच तो या हंगामात २०० पेक्षा अधिक गुणांची कमाई करणारा चौथा चढाईपटू ठरेल.
सुरेंदर गिल :
पटना पायरेट्स विरुध्द झालेल्या पराभवानंतर युपी योद्धा संघ स्पर्धेतून बाहेर झाला होता. परंतु सुरेंदर गिलने या संघासाठी अप्रतिम कामगिरी केली होती. त्याने या स्पर्धेतील २३ सामन्यात एकूण १८९ गुणांची कमाई केली.
