भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादव (Umesh Yadav) आज आपला ३६ वा वाढदिवस साजरा करतोय. उमेश यादवचा जन्म २५ ऑक्टोबर, १९८७ रोजी महाराष्ट्रातील नागपूरमध्ये झाला होता. यशाच्या शिखरावर असलेला उमेश यादव कोट्यवधींचा मालक आहे. मात्र इथपर्यंत पोहचण्यासाठी त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्याचे वडील कोळशाच्या खाणीत काम करायचे. त्यांची इच्छा होती की, उमेशने चांगल्या कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण करावं. असे असतानाही उमेशने हार मानली नाही आणि आपली स्वप्ने साकार केली.
उमेश यादवचे वडील तिलक यादव हे मूळचे उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. मात्र कोळशाच्या खाणीत काम करत असल्यामुळे त्यांना नागपूरला स्थलांतरित व्हावे लागले होते. त्याच्या वडिलांना नेहमीच असे वाटायचे की, आपल्या मुलाने चांगल्या कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण करावे. मात्र आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने ते शक्य होऊ शकले नाही. उमेशची उंची आणि शरीर यष्टी सुरुवातीपासूनच चांगली होती. त्यामुळे त्याच्या वडिलांना वाटायचे की, उमेशने पोलीस नाहीतर सैन्य दलात भरती व्हावं.
उमेश लहानपणापासूनच उत्तम क्रिकेट खेळायचा. मात्र त्याच्यावर खर्च करण्यासाठी त्याच्या वडिलांकडे पैसे नव्हते. तरीदेखील उमेश माघार घेतली नाही. त्याने कठोर परिश्रम आणि जिद्दीने आपले स्वप्नं पूर्ण केले. आज तो भारतीय कसोटी संघातील प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे.
२०१० मध्ये मिळाले भारतीय संघात स्थान...
देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भ संघासाठी खेळणाऱ्या उमेश यादवला २००८ मध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धेत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. पहिल्याच सामन्यात त्याने ७४ धावा खर्च करत ४ गडी बाद केले होते. रणजी ट्रॉफी स्पर्धेत केलेल्या जोरदार कामगिरी नंतर त्याला आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघात खेळण्याची संधी मिळाली होती. आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर त्याने आयपीएल स्पर्धेत देखील अनेक दिग्गज फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या. ही कामगिरी पाहता त्याला २०१० मध्ये भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. त्याने आतापर्यंत भारतीय संघासाठी एकूण १३६ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने २७६ गडी बाद केले आहेत.
