ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नचा शुक्रवारी (४ मार्च) हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. त्याने वयाच्या ५२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. एक गोलंदाज म्हणून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मोठ मोठे पराक्रम केले होते. आपल्या कसोटी कारकिर्दीत त्याने ७०८ गडी बाद केले होते. तसेच त्याच्या गोलंदाजीवर अनेक दिग्गज फलंदाज अडचणीत सापडायचे. त्याने १९९३ मध्ये इंग्लंड संघाविरुद्ध गोलंदाजी करताना असा काही चेंडू टाकला होता, ज्याची इतिहासात नोंद झाली होती.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोन्ही संघ जेव्हा ॲशेस मालिकेत आमने सामने येत असतात,त्यावेळी चाहत्यांना रोमांचक लढत पाहायला मिळत असते.४ जून १९९३ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात शेन वॉर्नने या शतकातील सर्वोत्तम चेंडू टाकला होता.
मँचेस्टरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील रोमांचक सामना सुरू होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने सर्वबाद २६९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघाला देखील चांगली सुरुवात मिळाली होती. इंग्लंड संघाची धावसंख्या १ गडी बाद ७१ अशी होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ॲलन बॉर्डरने चेंडू शेन वॉर्नच्या हाती दिला आणि त्यानंतर इतिहास घडला.
कर्णधाराने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत शेन वॉर्नने असे काही केले होते, जे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. या सामन्याचे समालोचन करत असलेल्या समलोचकाला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द देखील सापडत नव्हते. शेन वॉर्नने उजव्या हाताच्या फलंदाजाला ओव्हर द विकेटचा मारा करत लेग साईडच्या दिशेने चेंडू टाकला.
हा चेंडू इतका बाहेर होता की, फलंदाजाने हा चेंडू न खेळताच सोडण्याचा विचार केला. परंतु अंदाज पूर्णपणे चुकीचा ठरला आणि शेन वॉर्नचा हा चेंडू ऑफ स्टंपला जाऊन धडकला. त्याचा हा चेंडू तब्बल ९० डिग्री इतका स्पिन झाला होता. जो आतापर्यंतचा सर्वोत्तम चेंडू आहे. हा चेंडू अजूनही 'बॉल ऑफ द सेंच्युरी' म्हणून ओळखला जातो.
