शिवनारायण चंद्रपॉल डोळ्याच्या खाली काळ्या रंगाची पट्टी का लावायचा? वाचा खरं कारण

शिवनारायण चंद्रपॉल डोळ्याच्या खाली काळ्या रंगाची पट्टी का लावायचा? वाचा खरं कारण

भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये जेव्हा सामना रंगायचा त्यावेळी एक फलंदाज फलंदाजीला आल्यानंतर यष्टीवरील बेल्स काढायचा आणि खेळपट्टीवर ठोकायचा. तो फलंदाज होता वेस्ट इंडिज संघाचा दिग्गज फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल. गल्ली क्रिकेट जसं एखादा फलंदाज क्षेत्ररक्षकांचा घाम काढत असतो. तसच काहीसं हा फलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करायचा. लहानपणी शिवनारायण चंद्रपॉल नाव ऐकलं तर अनेकांना प्रश्न पडायचा, अरे हे नाव तर भारतीय आहे. मग हा वेस्ट इंडिज कडून कसा काय खेळतोय. तुम्हाला ही असा प्रश्न नक्कीच पडला असेल. जो पर्यंत वेस्ट इंडिज विरुद्ध मालिका सुरू असायची तोपर्यंत हा प्रश्न डोक्यात घर करून बसायचा. तेव्हा तर अँड्रॉइड फोन आणि इंटरनेट देखील नव्हतं गुगल करायला. (Shivnarine Chanderpaul) 

काही वर्ष उलटून गेली त्यानंतर कळालं की, शिवनारायण चंद्रपॉल हा भारतीय मूळचा आहे. त्याचे पूर्वज मूळचे भारतीय होते. बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात राहत असलेले पवन कुमार चंद्रपॉल १८७३ मध्ये गयाना येथे स्थलांतरित झाले होते. २०११ मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेत जेव्हा शिवनारायण चंद्रपॉल टीचून फलंदाजी करत होता, त्यावेळी बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारी कसोटी क्रिकेटपटूंना पुरस्कार देण्याची घोषणा केली होती. 

परंतु चौकशी केली असता, असा एकही क्रिकेटपटू नव्हता जो या पुरस्कारासाठी प्रबळ दावेदार असेल. धोनीला हा पुरस्कार देता येत नव्हता कारण तो झारखंडसाठी खेळत होता. परंतु ज्यावेळी नितीश कुमार यांना माहिती मिळाली की, शिवनारायण चंद्रपॉल हा बिहारी मुळचा आहे. त्यावेळी बिहार सरकारने हा पुरस्कार शिवनारायण चंद्रपॉलला देण्याचे ठरवले होते.

वेगळीच फलंदाजी शैली असलेल्या या क्रिकेटपटूने अनेकदा आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढले. तसेच तो एका विशेष कारणामुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरायचा. ते कारण म्हणजे डोळ्याच्या खाली असलेली काळ्या रंगाची पट्टी. लहानपणी अनेकांना असे वाटले असेल की, तो आपल्या देशाच्या झेंड्याचे स्टिकर लावत असेल. परंतु खूप कमी लोकांना यामागील खरे कारण माहित आहे. उन्हात खेळत असताना सूर्याची किरणे थेट डोळ्यांवर पडू नयेत म्हणून चंद्रपॉल या काळ्या रंगाच्या पट्टीचा वापर करायचा. या पट्टीला अँटी - ग्लेअर स्टिकर्स असे म्हणतात. याचा वापर उन्हातून येणाऱ्या सूर्यप्रकाशाचा प्रभाव कमी करण्यासाठी केला जातो. फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करताना तो या पट्टीचा वापर करायचा. अनेक खेळाडू सूर्यप्रकाशाचा प्रभाव कमी करण्यासाठी गॉगलचा वापर करतात.

वेस्ट इंडिज संघासाठी दोन दशकं क्रिकेट खेळलेल्या या फलंदाजाने कसोटी क्रिकेटमध्ये ११ हजार तर वनडे क्रिकेटमध्ये ९ हजार धावा केल्या होत्या. त्याने १९९४ मध्ये इंग्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यात आपल्या कसोटी कारकिर्दीला सुरुवात केली होती. तर शेवटचा कसोटी सामना देखील इंग्लंड विरुद्ध २०१५ मध्ये खेळला होता. १६४ कसोटी सामने खेळल्यानंतर त्याने ४१ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते.