या वर्षी वैशाखात फारशी लग्नं होणार नाहीत. काहीजण तर आता तुळशीच्या लग्नाची तारखेकडे डोळे लावून बसलेत. आता लग्न म्हटलं म्हणजे त्यात लग्नापूर्वी होणारी बैठक आलीच. अजूनही बर्याच ठिकाणी चार माणसांच्या साक्षीने चक्क याद्या केल्या जातात. वराचे कपडे, वधूचे दागिने, बस्ता, लग्नाचा एकूण खर्च, वरदक्षिणा, मानपान वगैरे वगैरे. पण याला कोणीही प्री-नप म्हणत नाहीत. भारतात अजूनतरी प्री-नपची प्रथा बोकाळलेली नाही. पण हे प्री-नप म्हणजे काय ते आधी समजून घेऊ या.
प्री-नप म्हणजे प्रीनप्शल अॅग्रीमेंट. विवाह करण्यापूर्वी नियोजित वधूवरांचा आपसांतला-दोघांपुरता करार. विवाहानंतर येणार्या जबाबदार्या- आर्थिक जबाबदार्या- आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे घटस्फोट घ्यायची गरज पडली तर पैसे- स्थावरजंगम मालमत्ता या सगळ्यांचे विभाजन कसे होईल याचा करार म्हणजे प्री-नप!
भारतात हे प्रकरण अजून फारसं बोकाळलेलं नाही. पण परदेशातली प्री-नप मात्र अजबगजब-चमत्कारीक असतात. त्यातून सेलेब्रीटी प्री-नपमधल्या अटी म्हणजे चमत्कारीक मुद्द्यांचा कळस असतो. चला, यावर्षी काही मुहूर्त दिसत नाहीयेत तर इतरांच्या प्री-नपची तर झाडाझडती घेऊ या!!









