अटारी गेम्स: गेमिंगमध्ये एकहाती मक्तेदारी ते कोट्यावधींच्या कर्जामुळे दिवाळखोरी!!

लिस्टिकल
अटारी गेम्स: गेमिंगमध्ये एकहाती मक्तेदारी ते कोट्यावधींच्या कर्जामुळे दिवाळखोरी!!

पूर्वी सापशिडी, ल्युडो, बुद्धिबळ, पत्ते, कॅरम, असे काही ठराविकच खेळ म्हणजे बैठे किंवा इनडोअर गेम म्हणून ओळखले जात. नंतर यात भर पडली ती व्हिडीओ गेम्सची आणि आता तर घरी बसून आणि एकट्यानेच खेळता येतील अशा गेम्सची गणतीच करता येणार नाही. पब्जी, फ्री-फायर, पोकेमॉन, असे कित्तीतरी व्हिडीओ गेम्स आज इतके प्रचलित आहेत की त्यांची यादी संपता संपणार नाही. या व्हिडीओ गेम्सनी आज आबालवृद्धांपासून सर्वांनाच वेड लावले आहे. यात अटारी या गेमिंग जायंट कंपनीचा वाटा खूपच मोठा आहे. ६०च्या दशकात आलेल्या या कंपनीला व्हिडीओ गेम्सच्या क्षेत्रात बरीच मोठी प्रगती केली होती इतकी मोठी की अवघ्या तीन वर्षात कंपनीला अब्जावधी रुपयांचा फायदा झाला होता.

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण व्हिडीओ गेमिंगला सुरुवात झाली ती १९६०च्या दशकातच. तेव्हा तर टीव्ही आणि कम्प्युटरचाही फारसा प्रसार झाला नव्हता. पण व्हिडीओ गेम्स मात्र प्रचंड लोकप्रिय होते. अटारी हे व्हिडीओ गेम्समधलं एक मोठं प्रस्थ! याचे संस्थापक होते नोलॉन बुश्नेल! नोलॉन इलेक्ट्रॉनिक इंजिनियर होते. स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी ते नव्या कल्पनांचा शोध घेत होते. एका अभ्यास दौऱ्यावर गेले असता त्यांना स्पेसवॉर नावाचा एक कम्प्युटर गेम पाहायला मिळाला. याच कम्प्युटर गेम वरून त्यांना अटारीची कल्पना सुचली. नोलॉन यांनी आपले मित्र टेड डॅब्नी यांच्यासोबत पहिल्यांदा काम सुरु केले. पाश्चात्य देशात त्याकाळी गेमिंग आर्केड नावाची संकल्पना खूपच लोकप्रिय होत होती. या आर्केडमध्ये मुलांना हवे तसे व्हिडीओ गेम्स खेळता येत असत.

पूर्वी आपण जसे कॉइनबॉक्समध्ये कॉइन टाकून फोन लावत असू तसेच या गेमिंग आर्केडमध्ये फक्त गेम्ससाठी मोठी मशीन्स ठेवलेली असत. त्यात कॉइन टाकून व्हिडीओ खेळ खेळता येत होते. १९७७ साली अटारी आर्केडने अटारी २६०० नावाचा एक नवा गेम रिलीज केला. हा अटारी २६०० म्हणजे आजच्या व्हिडीओ गेम्सच पूर्वजच म्हणा ना!

हे मशीन मायक्रोप्रोसेसरचा वापर करून बनवलेले होते. हे मशीन बाजारात आल्या आल्या लोकांच्या यावर अशा काही उड्या पडल्या की विचारू नका. या मशीनमुळे कोट्वयाधी लोकांना व्हिडीओ गेमिंगची ओळख झाली. आर्केडमधील मशीन्स आता घरोघरी पोहोचत होती. अर्थात घरी वापरता येण्याजोगे यात बदलदेखील करण्यात आले होते. १९७९ मध्ये या मशीन्सच्या विक्रीने लक्षावधीचा टप्पा ओलांडला होता. यावरूनच तुम्हाला अटारीच्या लोकप्रियतेचा अंदाज येईल! मुलांना बॅट-बॉलपेक्षा नवीन काही तरी देण्याची पालकांनाही मोठीच हौस होती. त्यात अटारी आल्याने पालकांची हौस आणि मुलांची मौज दोन्हींची पूर्तता झाली.

आता तर अटारीचा खप आणखीनच वाढला होता. त्यामुळे मशीनचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्हीही अधिकाधिक सुटेबल करण्यावर अटारीने भर दिला. मशीनचा आकार कमी-कमी होत गेला आणि गेम्सची व्हरायटीही वाढत गेली. १९८२ पर्यंत अटारीने कोट्यावधीचा टप्पा पार पार केला होता.

त्यानंतरही अटारीचा आलेख चढताच राहिला. व्हिडीओ गेमिंगच्या क्षेत्रात अटारीने एकहाती मक्तेदारी स्थापित केली होती आणि कित्येक दशके ही मक्तेदारी तशीच टिकून राहिली.
ऐंशीच्या दशकात अटारीला टक्कर देणाऱ्या दुसऱ्याही काही कंपन्या बाजारात आल्या. अर्थात या कंपन्या येण्यामागेही अटारीच जबाबदार होती. अटारीच्या यशाचे कारण म्हणजे अटारीचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्हीमध्ये होत आलेले बदल आणि लोकांना नेहमी काहीतरी नवे देण्याचा प्रयत्न. यासाठी अटारीचे इंजिनिअर्स आणि प्रोग्रामर्स कितीतरी कष्ट घेत होते. पण अटारीच्या मालकांना काही त्यांच्या कष्टाची किंमतच वाटत नव्हती. या प्रोग्रॅमर्स आणि इंजिनियर्सच्या मागण्यांकडे अटारीने सातत्याने दुर्लक्ष केले तेव्हा यातील काही इंजिनियर्स आणि प्रोग्रामर्स अटारीतून बाहेर पडले आणि त्यांनी आपापली व्हिडीओ गेमिंग कंपन्या स्थापन केल्या.

अटारीकडील कुशल मनुष्यबळ आता कमी झाले होते आणि प्रतिस्पर्धी वाढले होते. तरीही अटारीने आपल्या जुन्या धोरणात काही बदल केले नाहीत. त्यामुळे आतापर्यंत अटारीला जे कालसुसंगत बदल करणे शक्य होते ती बदलाची प्रक्रियाच थंडावत गेली. अटारीच्या अटारी-5200 मॉडेलने ग्राहकांचा अगदीच भ्रमनिरास केला. त्याचा रंग, नेव्हिगेशन कीज, गेमिंग व्हरायटी सगळ्याच बाबतीत हे मॉडेल अगदीच सुमार ठरले. या मॉडेलने अटारीच्या विक्रीचा दर चांगलाच खालावला. त्यामुळे त्यांनाआर्थिक तोटाही सहन करावा लागला.

तुलनेने प्रतिस्पर्धी कंपन्यांनी आपल्या व्हिडीओ गेम्समध्ये अनेक चांगले बदल केले. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण स्टीव्ह जॉब्जही सुरुवातीला अटारीमध्येच प्रोग्रॅम डिझायनर होते. नंतर त्यांनी अटारी सोडली आणि तेही दुसरीकडे गेले. अटारीने आपले बाजारातील स्थान टिकवण्यासाठी त्यानंतर खूप खूप प्रयत्न केले. पण काही जण म्हणतात अटारी-2600 सोबतच अटारी संपली होती. त्यानंतरच्या मॉडेल्सवर अटारीने बराच खर्च केला, पण त्यांना तितका प्रतिसाद मिळाला नाही. शिवाय प्रतिस्पर्धी कंपन्यातर अगदी पोर्नोग्राफिक गेमिंगपर्यंत घसरल्या होत्या. याचाही अटारीवर विपरीत परिणाम झाला. प्रतिस्पर्धी कंपन्यांची पातळी खालावली असली तरी अटारीने कधीच आपल्या व्हिडीओ गेमिंगमध्ये असले प्रयोग केले नाहीत.

एकेकाळी कोट्यावधींचा नफा कमावणाऱ्या अटारीवर नंतर इतकी नामुष्की आली की २००५ साली कंपनीवर कोट्यावधीचे कर्ज झाल्याने कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली. कंपनीवरील कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी अटारी इंक आणि तिच्याशी सलंग्न असलेल्या आणखी तीन कंपन्यांचा लिलाव करावा लागला होता.

आज तर अटारीचे नामोनिशाणही गवसत नाही!!

मेघश्री श्रेष्ठी