सोन्यासारखी गाणी देणार्‍या संगीतकार बप्पीदादांना सोने का आवडायचे ?

लिस्टिकल
सोन्यासारखी गाणी देणार्‍या संगीतकार बप्पीदादांना सोने का आवडायचे ?

संगीतकार आणि गायक बप्पी लहिरी. १९७०-८० च्या दशकात त्यांची गाणी सर्वात लोकप्रिय झाली. त्यांनी भारतात पॉप, डिस्को  प्रकारचे संगीत आणल्याने त्यांना डिस्को किंग म्हणूनही ओळखले जायचे.चलते-चलते, डिस्को डान्सर, शराबी यासारख्या अनेक चित्रपटांमधील गाण्यांमुळे ते  लोकप्रिय झाले.त्यांची आणखी एक ओळख म्हणजे त्यांचे सोन्याचे दागिने! या दागिन्यांमुळे त्यांची चेष्टाही व्हायची पण हीच ओळख प्रसिद्ध मायकेल जॅक्सनला त्यांचा चाहता बनवून गेली होती.

 


 

 

खुद्द बप्पी दा यांनी हा किस्सा कपिल शर्मा शोमध्ये सांगितला होता.मायकल जॅक्सन एकदा मुंबईत आला तेव्हा त्याची भेट बप्पी लाहिरी यांच्याशी झाली.  एका कार्यक्रमादम्यान बप्पी लाहिरी  एका जागी बसले होते. तेव्हा मायकल जॅक्सन त्यांच्याकडे आला.  तेव्हा त्याची नजर बप्पीदा यांच्या गणपतीच्या साखळीवर खिळली. त्याने उत्सुकतेने पाहत त्यांच्या सोन्याच्या साखळीचे कौतुक केले. त्यानंतर  बप्पीदा यांनी त्यांचे नाव आणि ओळख सांगितले. बप्पीदा मायकेल जॅक्सनला म्हणाले मी संगीतकार आहे आणि डिस्को डान्सर हे गाणे बनवले आहे. हे ऐकताच  मायकल जॅक्सन म्हणाला की मला तुझे जिमी-जिमीवाला गाणे आवडते आणि त्यांनी त्या गाण्याबद्दल चर्चा केली.

या किश्शावरून कळते की बप्पी दा यांनी त्यांची वेगळी ओळख निर्माण केली होती. चेहऱ्यावर सतत हसू आणि कोणीही टीका केली तरी त्याला हसून प्रत्युत्तर केले. त्यांनी इतके सोने घालायचे कारणही एका मुलाखतीत सांगितले होते की,अमेरिकन पॉप स्टार एल्विस त्याच्या कॉन्सर्टमध्ये सोन्याची चेन घालत असे. ते पाहिल्यानंतर त्यांनीही तेच करण्याचा विचार केला आणि आपली शैली बदलली. 
त्यांच्या  संगीताला  तरुणांना खूप आकर्षित केले. 'डिस्को डान्सर' आणि 'जिमी-जिमी' सारखी त्यांची गाणी आजही आयकॉनिक मानली जातात.

बप्पी लहिरी यांची ओळख

गोल्ड मॅन बप्पी लहिरी यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ मध्ये बंगाल, कोलकत्ता येथे झाला होता.त्यांना गायनाचा वारसा आपल्या आईवडीलांकडूनच मिळाला होता. त्यांचे आईवडील एक बंगाली गायक होते. त्यांना बालपणापासूनच गायनाची आवड होती. त्यांनी वयाच्या चक्क तिसऱ्या वर्षापासून तबला वादन सुरु केले होते. फारच कमी लोकांना माहिती असेल की किशोर कुमार हे बप्पी लहिरींचे मामा होते. 'डर्टी पिक्चर' या चित्रपटात त्यांनी संगीतबद्ध आणि पार्श्वगायन केलेल्या 'उ लाला' हे गाणंही चांगलंच लोकप्रिय ठरले होते.  २०२० मध्ये बागी-३ या चित्रपटासाठी त्यांनी अखेरचं संगीत दिग्दर्शन केले.अलीकडेच त्यांनी पॉप गायिका ज्युलिया प्राइससोबत अमेरिकेत  ‘दमादम मस्तकलंदर’ नावाचे एक गाणे रेकॉर्ड केले आहे.  पुढील महिन्यात ते प्रदर्शित होणार आहे.


त्यांची आजही अनेक गाणी प्रसिद्ध आहेत तुम्हाला त्यांचे कोणते गाणे आवडते?


शीतल दरंदळे