स्पेनमधले दुष्काळामुळे ३० वर्षांपूर्वी पाण्याखाली गेलेले भुताचे गाव पुन्हा वरती आले!!

स्पेनमधले दुष्काळामुळे ३० वर्षांपूर्वी पाण्याखाली गेलेले भुताचे गाव पुन्हा वरती आले!!

रहस्यमयी गोष्टींचे माणसाला कायम कुतूहल राहत आले आहे. आपण लहानपणापासून भुताच्या गोष्टी ऐकत आलो आहोत. त्यामध्ये एखादे जुने घर,वाडा, झाड किंवा व्यक्ती झपाटलेले असतात. ते अदृश्य होतात आणि पुन्हा येतात. असेच स्पेनमध्ये अख्खे गावच बुडाले आणि आता पुन्हा दिसू लागले आहे. होय! आम्ही स्पेनमधील असरेडो aceredo या गावाविषयी बोलत आहोत. हे गाव ३० वर्षांपूर्वी पाण्यात पूर्णपणे बुडाले होते. मात्र आता जलाशयाचे पाणी आटल्याने ते पुन्हा दिसू लागले आहे. तिथले लोक आता या गावाला भूताचे गाव म्हणतात.

स्पेनमधील गॅलिसिया प्रदेशात असेराडो नावाचे गाव होते. १९९० साली या गावाच्या मार्गावर एक जलाशय बांधण्यात येणार होता. तेव्हा या गावात ७० घरे आणि १२० नागरिक राहत होते. हे गाव छोटेसे असले तरी तो दुष्काळी भाग होता. त्यामुळे या गावाशेजारी असलेले बुस्कल्क हे गावही जलाशयाखाली जाणार होते. त्या वेळी सर्व लोकांना स्थलांतरीत करण्यात आले. पण स्थानिकांचा विरोध होता. संतप्त नागरिकांनी तक्रारी, निषेध केला. तसेच १० दिवसांचे उपोषणही केले. परंतु त्यांच्या विरोधाला न जुमानता त्यांना स्थलांतरीत होणे भाग पाडले गेले.

त्यासाठी काम सुरु झाले आणि त्या दरम्यान एका धरणातून पाणी सोडण्यात आलं. तिथल्या लिमिया नदीला पूर आला आणि हे असेराडो गाव पाण्यात बुडाले. सुदैवाने अनेकजण स्थलांतरीत झाले होते. ऐतिहासिक चर्च तेथून हलवण्यात आले होते. खूप घाईत स्थलांतरीत केल्यामुळे अनेक वस्तू बुडाल्या. या वस्तू आता पाणी आटल्याने दिसू लागल्या आहेत. गंजलेल्या गाड्या, रिकामे टेबल, बाटल्या ,डबे अश्या अनेक वस्तू दिसतात.

ज्या कुटुंबांना स्थलांतरित करण्यास भाग पाडले गेले त्यांचे नुकसान झाले. यांतले अनेकजण पिढ्यानपिढ्या असेराडो मध्ये राहत होते, त्यांना दुसरे घर कधीच माहीत नव्हते. काहींनी पर्याय नसल्याने जवळच्या गावांमध्ये स्थलांतर केले होते!

हा परिसर आता मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करत आहे. अनेकजण हे गाव पाहण्यास भेटी देत आहेत. या गावचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. हवामानातील बदलामुळे स्पेनचा सुमारे १० टक्के भाग अधिकृतपणे दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आला आहे.

शीतल दरंदळे