'गदाधारी भीम शांत झाला'! प्रवीणकुमार सोबतींचे निधन!!

लिस्टिकल
'गदाधारी भीम शांत झाला'! प्रवीणकुमार सोबतींचे निधन!!

१९८८ साली लहान पडद्यावर आलेल्या महाभारत मालिकेने लोकप्रियतेचे नवे विक्रम तयार केले होते. आजही महाभारतातील कुठल्याही व्यक्तिरेखेचे नाव घेतले तरी समोर चेहरा येतो तो या सिरीयलमध्ये ती भूमिका साकारलेल्या कलाकाराचा. भीष्म म्हणून मुकेश खन्ना, कृष्ण म्हणून नितीश भारद्वाज हे कलाकार आजही लोकांच्या स्मृतीत आहेत. याच मालिकेत भीम साकारणाऱ्या प्रवीण कुमार सोबती यांनी या जगाची सोबत मात्र सोडली आहे.

महाभारत मालिकेत काम केलेल्या कलाकारांनी महाभारतातील भूमिकांव्यतिरिक्त अनेक भूमिका केल्या आहेत. तरीही त्यांची ओळख महाभारतातील व्यक्तिरेखा हीच राहिली आहे. भीम साकारलेले प्रवीण कुमार सोबती हे फक्त एक कलाकार नव्हते. एक माजी सैनिक, एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात राजकारणी असे विविधांगी आयुष्य त्यांनी जगले आहे.

सुरुवातीला प्रवीण कुमार बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ) या लष्करी सेवेत सहभागी झाले होते. त्यांना थाळीफेक आणि हॅमर या खेळांमध्ये विशेष गती आहे हे त्यांनी वेळीच ओळखले आणि ते खेळाकडे वळले. ६० आणि ७० चे दशक त्यांनी आपल्या अफाट ताकदीच्या जोरावर विविध स्पर्धामध्ये पदके मिळवून गाजवले.

एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स आणि ऑलिम्पिक या तीनही आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाच्या समजल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये ते सहभागी झाले होते. १९६८ साली मेक्सिको १९७२ साली म्युनिक ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. पुढे वय पुढे सरकले तशी त्यांची खेळाडू म्हणून कारकीर्द संपली. त्याच काळात त्यांची फिल्मी कारकीर्द सुरू झाली.

एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स आणि ऑलिम्पिक या तीनही आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाच्या समजल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये ते सहभागी झाले होते. १९६८ साली मेक्सिको १९७२ साली म्युनिक ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. पुढे वय पुढे सरकले तशी त्यांची खेळाडू म्हणून कारकीर्द संपली. त्याच काळात त्यांची फिल्मी कारकीर्द सुरू झाली.

धर्मेंद्रचा लोहा, अमिताभचा शहनशहा तसेच अजुबा, घायल, करिष्मा कुदरत का, आज का अर्जुन, युद्ध, मोहब्बत के दुष्मन यांसारख्या ५० हून अधिक सिनेमा आणि सिरियल्समध्ये त्यांनी काम केले आहे. २०१३ साली त्यांचा शेवटचा सिनेमा बार्बारीक या नावाने आला होता. प्रवीण कुमार यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत निवृत्ती घेतली नाही असे दिसते.

त्यांच्या आतील एक सैनिक आणि एक खेळाडू त्यांना स्वस्थ बसू देत नसेल. कारण २०१३ साली वयाची साठी ओलांडल्यावर त्यांनी सिनेमा सोडून राजकारणात उडी घेतली. २०१३ साली आम आदमी पक्षाकडून दिल्ली विधानसभा त्यांनी लढवली होती. नंतर त्यांनी आम आदमी पक्षाचाही त्याग केला आणि भाजपात प्रवेश केला.

एवढे सगळे असूनही त्यांचा शेवट मात्र थोडा हलाखीचा झाला. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना आर्थिक तंगी सहन करावी लागत होती. शेवटी वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी आपला शेवटचा श्वास घेतला आहे. शांत गदाधारी भीम हा डायलॉग आपण नेहमी ऐकतो. पण आज गदाधारी भीम कायमचा शांत झाला असे म्हणण्याची वेळ आली आहे.

उदय पाटील