बॉलिवूड म्हणजे चिक्कार पैसा हे समीकरण प्रत्येकाच्या डोक्यात फिट्ट आहे. म्हणूनच देशभरातील लाखो तरुण बॉलिवूडमध्ये संधी मिळावी म्हणून आटापिटा करतात. हे समीकरण खरे देखील आहे. २००-३०० कोटींमध्ये कमाईचे आकडे आणि ५०-६० कोटी एकेक सिनेमासाठी आकारली जाणारी फी यामुळे याला पुष्टी मिळते.
सिनेमा तीन तासांचा असतो आणि त्यासाठी काही महिने या हिरो मंडळींना मेहनत घ्यावी लागते. पण टीव्हीवर आपल्याला दिसणाऱ्या काही सेकंदांच्या ऍडसाठी पण ते काही कमी पैसे घेत नाहीत. यात सुपरस्टार समजल्या जाणाऱ्यांपासून तर बऱ्यापैकी बस्तान बसवलेल्या स्तरापर्यंत जबरदस्त पैसे घेणाऱ्यांची यादी करता येईल. यातली काही नावे आणि त्यांच्या जाहिरातीची फी यांची आज माहिती करून घेऊ.
१) शाहरुख खान
शाहरुखचे सिनेमे गेले ३ वर्षं आले नसले तरी त्याला जाहिरातींची कमतरता नाही. बायजू या जगात सर्वात वेगाने वाढणाऱ्या एज्युटेक कंपनीचा तो ब्रँड अँबेसेडर आहे. सोबतच रिलायन्स जिओ, ह्युंदाई यांच्याही जाहिराती तो करतो. यासाठी तो ५- १० कोटी इतकी आकारणी एका ऍडसाठी करतो.










