एखादी गाडी एकाच ठिकाणी पार्क करून वर्षानुवर्षे तिच्याकडे कुणी फिरकलेच नाही तर काय होईल? गाडीचे काही पार्टस् गायब होतील आणि गाडी भंगारात घालण्याच्याच योग्यतेची बनेल. हा झाला आपला अंदाज! मात्र इटलीमध्ये गेली चाळीस पेक्षा जास्त वर्षे एकाच ठिकाणी उभ्या असलेल्या गाडीचे चक्क स्मारक केले जात आहे.
इटलीतील कोनीगॅनो शहरात एंजेलो फ्रीगोलंट यांचा न्यूजपेपर आणि मासिकांचा स्टॉल होता. त्यांच्या लान्सिया फुलवा १९६२ कारमधून ते वर्तमानपत्र आणि मासिकांचे गठ्ठे आणत आणि आपल्या दुकानात उतरवून घेत. गठ्ठे उतरवल्यानंतरही त्यांची ही लान्सिया फुलवा दुकानासमोरच पार्क केलेली असे. एंजेलो यांचा हा नित्याचाच दिनक्रम बनला होता. कालांतराने त्यांनी आपले हे दुकान बंद केले, पण आपली कार मात्र त्या दुकानाच्या दारातच पार्क करून ठेवली. सुमारे ४७ वर्षे झाली त्यांची लान्सिया अजूनही त्याच ठिकाणी पार्क केलेली आहे.
इतक्या वर्षांत एकाच ठिकाणी पार्क केलेली ही गाडी आजूबाजूच्या लोकांसाठी तर सवयीची बनून गेलीच, पण बाहेरून येणाऱ्या पर्यटकांनाही हिचे आकर्षण सुटले नाही. अनेक लोकांनी या कार सोबत काढलेले सेल्फी सोशल मिडीयावर पोस्ट केले. त्यामुळे तर कुणाला घराचा पत्ता वगैरे सांगताना या इटालियन स्ट्रीटवर राहणारे लोक लँडमार्क म्हणून आवर्जून या कारचा उल्लेख करू लागले.


