सावळजच्या (सांगली) बाळू लोखंडेंची खुर्ची गेली सातासमुद्रापार! सोशल मीडिया वर माजवला हाहाकार..

लिस्टिकल
सावळजच्या (सांगली) बाळू लोखंडेंची खुर्ची गेली सातासमुद्रापार! सोशल मीडिया वर माजवला हाहाकार..

जेष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले आपल्या कामानिमित्त विविध देशांमध्ये फिरत असतात. त्यांचे क्रिकेटवरील व्हिडीओ अनेक लोक बघतात पण त्यांच्या एका व्हिडीओने सध्या महाराष्ट्रभर चर्चा घडवून आणली आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ क्रिकेटवरील नाही.

इंग्लडमधल्या मँचेस्टर येथे त्यांना एक खुर्ची दिसली. ती खुर्ची सध्या महाराष्ट्रात कुतूहलाचा विषय आहे. मँचेस्टर येथे चक्क सांगली जिल्ह्यातल्या सावळजमधली खुर्च्या जाऊन पोहोचल्या आहेत. लेले यांचे अचानक एका खुर्चीकडे लक्ष गेले होते. त्यांनी लगोलग त्याचा व्हिडीओ काढून पोस्ट केला.

 

सांगली जिल्ह्यातील सावळज येथील बाळू लोखंडे यांचे नाव लिहिलेली ही खुर्ची बघून लेले यांना पण आश्चर्य वाटले. कारण इकडून तिकडे जाणारे लोक तब्बल १३ किलो वजनाची ही जुनी खुर्ची का म्हणून तिकडे घेऊन गेले असतील हा प्रश्न लेले यांच्यासकट सर्व महाराष्ट्राला पडला आहे. गंमत अशी आहे की तिथे या एक नाही, दोन खुर्च्या आहेत. पण लेल्यांनी एकाच खुर्चीचा उल्लेख केल्यामुळे दुसरी खुर्ची बिचारी उपेक्षित राहिली आहे.

विशेष बाब म्हणजे बाळू लोखंडे यांनी १५ वर्षांपूर्वी या खुर्च्या भंगारात विकल्या होत्या. १५ वर्षांनी या खुर्च्यांचा शोध लागला तो थेट इंग्लन्डमध्ये. यामुळे बाळू लोखंडे हे पण चक्रावून गेले आहेत. माया मंडप डेकोरेटर्स नावाने बाळू लोखंडे यांचा व्यवसाय आहे. आपल्या कामासाठी त्यांनी प्रत्येक सामानावर स्वतःचे नाव लिहिले आहे.

एका रेस्टॉरंट बाहेर ठेवलेली ही खुर्ची नेमकी तिथे पोहोचली कशी हा प्रश्न गेले दोन दिवस नेटकऱ्यांना सतावतो आहे. एकाहून एक भन्नाट प्रतिक्रिया यावर उमटत आहेत.

 

 

या खुर्च्यांनी सातासमुद्रापार झेंडे फडकवले हे मात्र खरे!!