तुमच्या घरी लहान मूल आणि इंटरनेट दोन्ही गोष्टी आहेत का? मग तर तुमच्यासाठी आमचा आजचा विषय अगदी जिव्हाळ्याचा असेल. आजच्या काळात कोकोमलनचा जेजे आणि त्याचा परिवार मोबाईल स्क्रीनमधून अगदी घराघरांत पोहचला आहे. नुसता पोहचला नाहीये तर अगदी राज्य करतोय. तुमच्या घरात युट्यूबवर कोकोमेलनची गाणी लागतात का? तुमचं मूल या गाण्याचे फॅन आहे का? नसलं तरी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एका जोडीने आपल्या मुलांसाठी सुरू केलेले व्हिडिओ ते जगातलं दुसऱ्या नंबरचे यूट्यूब चॅनल हा कोकोमलनचा प्रवास!!
प्रवासाला सुरावात करण्यापूर्वी आपण समजावून घेऊया कोकोमेलन आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे बडबडगीतं आणि लहान मुलांच्या इतर गाण्यांवर असलेल्या अनिमॅशन व्हिडिओजचं चॅनल. तुमच्या लहानपणी कदाचित तुम्ही जिंगलटून्स या मराठी बडबडगीते असणाऱ्या सिडीज पाहिल्या असतील, त्याचेच हे मोठे भावंडं म्हणावे लागेल. आजच्या घडीला यूट्यूबवर या चॅनलचे १२ कोटी सबस्क्रायबर्स आहेत. सगळ्यात जास्त व्हिडिओ व्ह्यूजचा टप्पा या चॅनलने गाठला आहे. एवढेच नाही तर यूट्यूबवरून बाहेर पडून हे चॅनल आता Netflix सारख्या माध्यमावर आपला ठसा उमटवत आहे. कोकोमेलनचा शो हा अमेरिकेत सर्वात जास्त काळ टॉप टेनमध्ये राहणारा शो म्हणून ओळखला जातोय. पण या सगळ्याची सुरुवात अगदी साधीच म्हणावी लागेल.




