हैती हा एक कॅरीबियन देश. हा देश निसर्ग सौन्दर्याने नटलेला असूनही अत्यंत गरीब देश म्हणून ओळखला जातो. हैतीची एवढीच ओळख पुरेशी नाही, हैती आज जसा एक गरीब देश म्हणून ओळखला जातो तसाच तो किडनॅपर्सचा देश म्हणूनही ओळखला जातो. याचे कारण काय माहितीये? कारण आज हैतीतील तरुणांच्या टोळ्या राजरोसपणे कुणाचेही अपहरण करू लागल्या आहेत. अगदी परवाच यातील एका टोळीने सतरा अमेरिकन नागरिकांचे अपहरण केले असून यात दोन वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीतर हे अपहरणकर्ते या लोकांचा जीव घेण्यासही मागे पुढे पाहणार नाहीत.
अमेरिकेलाही जेरीस आणणाऱ्या ह्या हैतीतल्या गुंड टोळ्यांबद्दल ऐकलंय का?


हैतीची कायदेव्यवस्था अगदी कोलमडून गेली आहे. तालिबानचेच दुसरे रूप म्हणजे हैती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, पण हैतीची अशी अवस्था झालीच कशी आणि कुणी केली? हैती किडनॅपर्सचा देश कसा बनला? हैतीला या दुष्ट विळख्यातून वाचवण्यासाठी कुणी खंबीर नेता आहे की नाही? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण लेख नक्की वाचा.
हैती मध्ये किडनॅपिंग हा एक राजरोस चालणार रोजगार बनला आहे. परवा म्हणजे १६ ऑक्टोबर रोजी हैतीच्या '४०० मावोजो' नावाच्या एका गॅंगने राजधानी पोर्ट ओ-प्रिंस पासून जवळ असलेल्या एका अनाथालयातून परतत असणाऱ्या १७ परदेशी नागरिकांचे अपहरण केले आहे. यामध्ये १६ नागरिक हे अमेरिकन आहेत तर एक मेक्सिकोचा नागरिक आहे. या १७ जणांच्या सुटकेसाठी या गॅंगने १३० कोटी रुपयांची मागणी केली आहे.
या गुन्हेगारांवर वचक राहील असा कुठलाच कायदा तिथे चालत नाही. उलट गुन्हेगारांना अभय आणि सामान्य लोकांना वेठीस धरण्याचीच वृत्ती जास्त दिसते. हैतीची ही अवस्था कशी झाली आणि कुणी केली हे जाणून घेण्यासाठी थोडासा हैतीचा इतिहास जाणून घेणे गरजेचे आहे. तर गोष्ट आहे १९५७ सालची जेव्हा हैतीच्या राष्ट्रपतिपदी फ्रांस्वा डुवालिए नावाचा एक डॉक्टर आला. याला लोक ‘पापा डॉक’ म्हणूनही ओळखत.

पापा डॉकला इतिहासाचा चांगलाच अभ्यास होता. इतिहासातून धडे शिकले पाहिजेत, यावरही त्याचा दृढ विश्वास होता. पापा डॉकच्या आधी हैतीमध्ये एकूण ३४ राष्ट्रपती होऊन गेले होते. यातील फक्त सहा राष्ट्र्पतीच आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले बाकी राष्ट्रपतींची एक तर हत्या करण्यात आली होती किंवा त्यांना सत्तेवरून पायउतार होण्यास भाग पाडले होते. हैतीतील कृष्णवर्णीय क्रांतीचे नेते जॅक डेसली यांचीही अशीच निर्घृण हत्या करण्यात आली होती. इतिहासातील या घटनांतून धडे घेऊन आपल्यावर अशी वेळच येऊ नये म्हणून पापा डॉकने पूर्ण खबरदारी घेतली. आपल्या संरक्षणासाठी त्याने सरकारी सुरक्षा रक्षकांऐवजी स्वतःची वैयक्तिक सुरक्षा यंत्रणा तयार केली. यामध्ये हैतीतील तरुणांचा भरणा केला. त्याच्या या वैयक्तिक सुरक्षा यंत्रणेचे नाव होते, टोनटोन मकूत. या टोनटोन मकूत मध्ये गुंड वृत्तीच्याच लोकांचा भरणा होता. या गुंडांना पापा डॉककडून कसलाच मोबदला मिळत नसे. तरीही ते पापा डॉकशी प्रामाणिक राहण्याची शपथ घेत. स्वतःचा खर्च चालवण्यासाठी या टोनटोन मकूत मधील लोकांना लुटालूट, चोरीमारी, किंवा तत्सम गुन्हे करण्याची परवानगी होती. खुद्द पापा डॉकचाच यांच्या डोक्यावर वरदहस्त असल्याने त्यांना रोखणारे कुणीच नव्हते. पापा डॉकविषयी जरा कुणी अपशब्द उच्चारला किंवा विरोध जरी केला तरी हे टोनटोन मकुतचे गुंड त्याचा लगेच बंदोबस्त लावून टाकीत. यांच्या भीतीने कुणीही पापा डॉक आणि त्याच्या या आर्मीविरोधात चकार शब्दही उच्चारत नसत. एकदा ब्रिटिश दूतावासातील अधिकाऱ्याने या मकूतच्या वाढत्या मुजोरीबद्दल पापा डॉकजवळ तक्रर केली तर दुसऱ्या दिवशी मकूतने ब्रिटिश दूतावासच बंद पाडले आणि ब्रिटिश राजदूताला हैतीतून काढता पाय घ्यावा लागला. या घटनेवरून टोनटोन मकूतचा धाक किती जबर होता याची कल्पना येईल.

टोनटोन मकुतचे हे गुंड साध्याच वेशात असत, पण त्यांच्या कमरेला कायम गन खोचलेली असे. कुणीही आडवा आला किंवा तसा प्रयत्न जरी केला तरी त्याला आडवा करणे सोपे जावे म्हणून त्यांना ही खास परवानगी दिलेली होती.
पापा डॉकच्या मृत्यूपर्यंत तरी हैतीत हा हैदोस असाच सुरु राहिला. १९७१ मध्ये त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मुलगा बेबी डॉकने हैतीची सूत्रे स्वतःकडे घेतली. बेबी डॉक आणि त्यांची टोनटोन मकूत आर्मीविषयी लोकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला होता. काही राजकीय पक्षांनी लोकांच्या या असंतोषाला खतपाणी घालून बेबी डॉक विरोधात कट रचण्यास सुरुवात केली. जनतेचा असंतोष ठिकठिकाणी दिसूही लागला होता. बेबी डॉक स्वतःच्या जिवाच्या भीतीने हैती सोडून पळून गेला.

बेबी डॉक गेला आणि टोनटोन मकूत बरखास्त झाली असली तरी या टोळीच्या दिनक्रमात काहीच बदल झाला नाही. गुंडगिरी करण्याची त्यांची सवय काही गेली नाही. त्यांच्या त्यांच्या एरियातील सरकारी सेवेसाठी आणि खाजगी सेवेसाठीही हे लोक जबरदस्ती हप्ता वसूल करू लागले. ज्यांनी कुणी हप्ता देण्यास नकार दिला त्याची शेवटची घटका जवळ आलीच समजायची. अधिकाऱ्यांना यांची मुजोरी माहिती असून ते देखील जिवाच्या भीतीने त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यास घाबरतात. कारवाई करण्याऐवजी त्यांनाच संरक्षण देऊन सरकारी अधिकारी त्यांच्या नजरेत ग्रेट बनण्याचा प्रयत्न करतात. सामान्य लोकांना तिथे कुणीच वाली नाही.

परदेशी नागरिकांची तर खैरच नाही. आजपर्यंत कित्येक परदेशी नागरिक या गुंडगिरीमुळे आपल्या जीवाला मुकले असतील याची मोजदाद नाही. दुकानात घुसून लूट करताना, एखाद्याला पकडून त्याचे अपहरण करताना किंवा कुणाचा खून करताना अगदी कुठलेही गैर काम करताना हे लोक खुलेआम करतात कारण यांना माहिती आहे, यांना रोखण्याची कुणातच हिंमत नाही.
हैतीत या गुंडाचेच राज्य चालते म्हटले तरी चालेल. हैतीमध्ये गेली अनेक वर्षे राजकीय अस्थिरता आहे, सगळे नेते सामान्य जनतेची काळजी करण्याऐवजी आपलीच तुंबडी भरण्यात धन्यता मानतात, मग या गुंडांना रोखणार कोण?
गेल्याच वर्षी हैतीमध्ये ६०० किडनॅपिंगच्या केसेस दाखल झाल्या आहेत. यावरून तिथे गुन्हेगारीने कसा हैदोस मांडला आहे, हे लक्षात येते.

फक्त किडनॅपिंगचं नाही तर खून आणि बलात्कार यातही हे गट कमी नाहीत. टोनटोन मूकत बरखास्त झाल्यांनतर त्यातून बाहेर पडलेल्या अनेकांनी स्वतःचे नवे गट स्थापन केले आणि आहे तेच काम पुढे सुरु ठेवले. त्यामुळे अशा गुन्हेगारी गटांचा इथे सुळसुळाटच झाला आहे. तसेही तरुणांना रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांना गुन्हेगारी शिवाय किंवा अशा कुठ्ल्यातरी गटाचा भाग झाल्याशिवाय पर्यायच नाही.
४०० मवोजो ही देखील अशाच नवख्या तरुणांचा गट आहे. या गटाच्या नावावर आजवर शेकडो गुन्हे नोंद असतील. याआधीचे गट किमान धार्मिक क्षेत्रात तरी डवळाढवळ करत नसत, मात्र ४००मवोजोने हा नियमही धाब्यावर बसवला आहे. चर्च आणि पाद्री लोकांना देखील यांनी सोडलेले नाही.

अमेरिकन सरकार आपल्या लोकांना सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे, मेक्सिकन सरकार देखील आपल्या एका नागरिकासाठी प्रयत्न करत आहे. हे नागरिक ज्यात लहान मुलांचाही समावेश आहे, सुखरूप सुटणार की,, या माथेफिरुंच्या विकृतीचे शिकार होणार हे कुणीच सांगू शकत नाही.

हैतीतील ही अराजकता पाहून अंगावर काटा येतो. आवाज चिरडणारे कोणत्या थराला जाऊ शकतात याची ही एक झलक म्हणावी लागेल.
लोकशाहीत सरकार चालवण्यासाठी नुसती सत्ताच नाही तर प्रभावी विरोधकही तितकेच महत्वाचे असतात, असे का म्हटले जाते हे यावरून लक्षात येईल.
मेघश्री श्रेष्ठी