स्वत:च्या मालकीचा भूभाग नाही, पण पासपोर्ट, मिलिटरी, शासन आणि कायदेव्यवस्था,हे सगळं असलेला देश माहित आहे??

लिस्टिकल
स्वत:च्या मालकीचा भूभाग नाही, पण पासपोर्ट, मिलिटरी, शासन आणि कायदेव्यवस्था,हे सगळं असलेला देश माहित आहे??

देश म्हणजे काय? ठराविक सीमांचा एक भूभाग जिथे त्या देशाचे नागरिक सुरक्षितपणे आपले व्यवहार करतात. पण एखाद्या देशाला जर त्याचा स्वतःचा असा भूभाग म्हणजे जमीनच नसेल तर? अस कसं असं होऊच शकत नाही. भूभाग नसेल तर देश कसा बनणार?

हो, हे खरं आहे. पण बघा मंडळी हे जग असे आहे जिथे काहीही शक्य आहे. अगदी स्वतःची जमीन नसलेला देश असणेही शक्य आहे. महत्वाचे म्हणजे जमीन नसलेल्या या देशाला संयुक्त राष्ट्राची मान्यता आहे आणि या देशाचे इतर १७० देशांशी व्यापारी संबंधही आहेत. त्यांची स्वतःची भाषा आहे, त्यांचा स्वतःचा स्टँप आहे आणि त्यांचे स्वतःचे चलन देखील आहे. यांच्याकडे नाही ती फक्त त्यांची जमीन. तरीही त्यांचे स्वतःचे सैन्य आणि नागरिकही आहेत.

इतके सगळे असूनही फक्त स्वतःची जमीन नसलेला हा देश आहे तरी कोणता, त्याचे नाव काय? हे सांगण्यासाठीच हा लेखनप्रपंच!

या देशाचं नाव आहे "द सोव्हरेन मिलिटरी हॉस्पिटॅलर ऑर्डर ऑफ सेंट जॉन ऑफ जेरुसलेम ऑफ र्होड्स अँड ऑफ माल्टा"!!! बापरे! जमीन नाही, पण नाव किती मोठं बघा. हे याच कागदोपत्री असलेलं नाव आहे, पण म्हणताना याला ‘सोव्हरेन मिलिट्री ऑर्डर ऑफ माल्टा’ असं म्हणतात. इथलं चलन आहे माल्टीसज स्कुडो. सध्या हे चलन इतरत्र कुठेही चालत नाही. या देशाची अधिकृत भाषा आहे इटालियन आणि या देशाचा राजधर्म आहे रोमन कॅथलिक. हा देश १०९९ मध्ये ब्लेस्ड गेरार्ड यांनी स्थापन केला होताअधिकृतरित्या या देशाला जगातील सर्वात मोठे सरदार घराणे आहे. खूप खूप वर्षापूर्वी सध्याच्या इस्राएल, सायप्रस, ग्रीस, इटली आणि माल्टा या देशांमध्ये या सरदार घराण्याने जमीन हस्तगत केली होती. या देशाच्या लांबलचक नावामुळे सॉम अशा लघुरुपानेही ओळखले जाते. युरोपातला माल्टा देश आणि हा माल्टा हे वेगवेगळे देश आहेत.

सद्या या देशाकडे स्वतःची मिलिट्री आहे, शासन आहे, कायदेव्यवस्था आहे आणि पासपोर्टही आहे. त्यांच्या माल्टा बेटावर त्यांचे स्वतंत्र चर्च देखील आहे. त्यांचा स्वतःचा झेंडा आणि शस्त्रास्त्रेसुद्धा आहेत. जगातील काही ठराविक ठिकाणी हा झेंडा फडकवला जातो. विशेषत: माल्टा बेटावर आणि इटलीतल्या त्यांच्या मुख्यालयावर हा झेंडा फडकताना दिसतो. लाल रंगाच्या पृष्ठभागावर पांढरा क्रॉस असे त्याच्या झेंड्याचे स्वरूप आहे.

या देशात अजूनही राजेशाही आहे. या देशाचा राजकुमार आणि त्याचा गुरु यांच्याकडे या देशाची सत्तासत्रे एकवटलेली आहेत. या देशात अधिकृत लोकसंख्या दोन नागरिक एवढीच असली तरी यांचे १३,००० सदस्य आणि ८०,००० स्वयंसेवक आहेत. या घराण्याचा एक सरदार सध्या रिपब्लिक ऑफ माल्टा येथील अँजेलो फोर्टच्या वरच्या मजल्यावर राहायला आहे.

या देशाच्या १३,००० हजार सदस्यांची ‘सेंट पॅट्रिक्स डे’च्या दिवशी परेड होते. यादिवशी ओमाघ आणि नॉर्दर्न आयर्लंडमध्ये हे लोक एकत्र जमतात आणि परेड करतात. या देशाचे चलन आहे आणि स्टॅम्पही आहेत. जगातील १०७ देशांशी यांचे राजकीय संबंध आहेत. संयुक्त राष्ट्र संघात त्यांना फूल ऑब्जर्व्हर स्टेट्स आहे. जमीन नाही आणि रस्तेही नाहीत तरीही हा देश आपल्या नागरिकांना ड्रायव्हिंग लायसन्स देतो आणि त्यांची स्वतंत्र नंबर प्लेटही असते. या देशातील नागरिकांना जगभर प्रवास करता यावा म्हणून त्यांना पासपोर्ट दिला जातो. गंमत म्हणजे जमीन नसलेला हा देश जर तुम्हाला पाहायचा असेल तर पाहू शकता. यांच्याकडे जमीन नसली तरी ते दुसऱ्या देशातील जमिनीवर आपला हक्क सांगतात आणि तिथल्या जमिनीवर यांनी काहीप्रमाणात कायदेशीर हक्क मिळवले आहेत.

हा देश पाहायचं असेल तर मग नक्की कुठे जावं लागेल?

हा देश पाहायचं असेल तर मग नक्की कुठे जावं लागेल?

पलॅझो माल्टा (रोम, इटली)
यातील पहिले ठिकाण म्हणजे पलॅझो माल्टा. हे ठिकाण इटलीची राजधानी रोममध्ये आहे आणि या ठिकाणाला सोव्हरेन माल्टाची राजधानी म्हटले जाते. याला पलॅझो माल्टा असेही म्हटले जाते. सोव्हरेन ऑफ माल्टाची सर्व मुख्यालये याच ठिकाणी आहेत.

व्हिला माल्टा (रोम, इटली)
हे ठिकाणही इटलीतल्या रोम शहरातच आहे. तुम्ही या व्हिला माल्टाला भेट देऊ शकता. रोम मधील एका उंच ठिकाणावर असलेल्या या इमारतीत सोव्हरेन ऑफ माल्टाचे ग्रँड प्रीओरी राहतात. या दोन्ही ठिकाणी तुम्हाला त्यांचे झेंडेही दिसतील. इटलीमध्ये या देशाचा दूतावास आहे आणि इटलीनेही सोव्हरेन ऑफ माल्टा हा एक स्वतंत्र देश असल्याचं मान्य केलं आहे.

सेंट अँजेलो फोर्ट
त्यानंतर याचं तिसरं ठिकाण आहे, सेंट अँजेलो फोर्ट. या किल्ल्याला तुम्ही भेट देऊ शकता. जो सोव्हरेन ऑफ माल्टाच्या ताब्यात आहे.

या तीन ठिकाणी जर तुम्ही भेट दिलीत तर, तुम्ही अगदी छातीठोकपणे हे सांगू शकाल की, तुम्ही जमीन नसलेला देश पहिला आहे.

-मेघश्री श्रेष्ठी