चमचे, चिमटे, कात्री,कंगवे, किल्ल्या आणि अशाच काही मध्ययुगीन काळातल्या २० गोष्टी आजही तशाच आहेत?

लिस्टिकल
चमचे, चिमटे, कात्री,कंगवे, किल्ल्या आणि अशाच काही मध्ययुगीन काळातल्या २० गोष्टी आजही तशाच आहेत?

जुन्या काळातल्या गोष्टींबद्दल माणसाला कायम कुतूहल वाटत आलं आहे. आपल्या एक किंवा दोन पिढ्या आधीच्या काळातल्या वस्तू आपण अनेकदा घरात जपून ठेवतो, मग ती भांडीकुंडी असोत, फर्निचर असो, वा कुठलेही अँटिक म्हणता येतील असे आयटम्स. काळानुरूप विविध वस्तू, त्यांची डिझाईन्स, वापरणाऱ्या ग्राहकांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन या सगळ्यात बदल होत गेले तरी 'जुनं ते सोनं' म्हणणाऱ्यांची संख्या कमी नाही. आज आपण जातोय ते थेट मध्ययुगीन काळात. हा काळ म्हणजे साधारण पाचव्या शतकापासून ते पंधराव्या शतकापर्यंतचा कालावधी. त्या काळातले लोक कोणत्या वस्तू वापरायचे आणि त्यांचं आजचं आधुनिक स्वरूप कसं आहे याची रंजक सफर तुम्हाला नक्कीच आवडेल. मध्ययुगीन काळातलं आयुष्य आजच्यापेक्षा खूपच वेगळं होतं आणि हे त्यावेळी वापरात असलेल्या वस्तूंवरून आणि गोष्टींवरून दिसून येतं. मात्र काही वस्तूंचं बाह्य स्वरूप आणि त्या वापरण्याची पद्धती हे बरंच आजच्या काळातल्या सारखंच आहे.

घड्याळ

घड्याळ

आजचा जमाना डिजिटलचा आहे. त्याला घड्याळंही अपवाद नाहीत. पण मध्ययुगीन काळात वापरली जाणारी घड्याळं फोटोत दाखवल्याप्रमाणे असत. त्यांचं डिझाईन बरंच गुंतागुंतीचं होतं. मुख्य घड्याळाची तबकडी इथे दुय्यम स्थानी दिसते आणि बाकी रचना जास्त लक्ष वेधून घेते. अर्थातच अशा दुर्मिळ अँटिक्सना बाजारात प्रचंड मागणी आहे आणि अशा वस्तू जमवण्याचा छंद असलेले त्यापैकी वाट्टेल ती किंमत मोजायला तयार असतात.
 

पावत्या

पावत्या

या दोन पावत्यांमधला फरक सहज लक्षात येतो. एक म्हणजे त्यासाठी वापरलेला कागद. मध्ययुगीन काळात कागदाऐवजी अनेकदा भूर्जपत्राचा वापर केला जात असे. या काळाच्या उत्तरार्धात जसजसं कागद बनवण्याचं तंत्रज्ञान विकसित झालं तसतसं लिनन फायबर, कापूस यांच्या साह्याने कागद बनवला जाऊ लागला. आज वापरल्या जाणाऱ्या कागदापेक्षा हा कागद जास्त टिकाऊ होता. लिहिण्यासाठी मुख्यतः पिसाचा वापर केला जात असे आणि शाई कोळशापासून बनवली जाई. नंतरच्या काळात त्यासाठी ॲसिड मेटल सोल्युशनचा वापर केला जाऊ लागला. आजच्या छापील कागदी पावतीच्या तुलनेत ही प्रणाली बरीच वेगळी होती.
 

हाती धरावयाचे लहान आरसे

हाती धरावयाचे लहान आरसे

याच्या डिझाईन आणि स्वरूपात फारसा फरक झालेला नसला तरी त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घटकांमध्ये बदल झाले आहेत. मध्ययुगीन काळातले छोटे आरसे मुख्यतः ब्रॉंझ किंवा हस्तिदंत याचे बनवलेले असत. फोटोतल्या आरशाची महिरप ओतीव लोखंडाची बनलेली आहे. त्याकाळी असे आरसे अत्यंत महाग असत. त्यात आरसा म्हणून काचेचा वापर केला जाई.

शौचालय

शौचालय

आजच्या कमोड सिस्टीमवाल्या शौचालयांच्या तुलनेत पूर्वीची शौचालयं खूपच वेगळी होती. या फोटोत दाखवल्यानुसार भोकाच्या खाली असलेल्या पाईप्समधून सर्व मैला जवळच्या तलाव किंवा खंदकाकडे वाहून नेला जाई.
 

कंगवे

कंगवे

आजकाल कंगवे मुख्यतः प्लास्टिकचे असतात. मध्ययुगीन काळात ते हाडं, शिंगं, हस्तिदंत यापासून बनवलेले असत. अनेकदा त्यांच्यावर सुंदर कोरीव काम केलेले असे किंवा स्त्री-पुरुष प्रेमसंबंध दर्शवणारे देखावे, प्राणी आणि पक्षी यांची चित्रे चितारलेली असत. कंगवा ही त्या काळात प्रियकराने प्रेयसीला भेट देण्याची मौल्यवान वस्तू समजली जाई.

किल्ल्या

किल्ल्या

किल्ल्यांसाठी त्या काळात वापरला जाणारा धातू म्हणजे लोखंड. कधीकधी तांब्याचाही संमिश्र वापर केला जात असे. या किल्ल्यांच्या लांबीवरून त्या कोणत्या प्रकारच्या कुलपांसाठी - घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप किंवा कपाटाचे कुलूप इत्यादी - वापरल्या जातील हे ठरत असे. बहुतेक किल्ल्यांची टोकं अणकुचीदार असत. तेव्हाच्या आणि आताच्या किल्ल्यांची तुलना केली तर मुख्य फरक हा त्यांचा जो भाग कुलपात शिरतो तेथील बिट्सच्या रचनेत आहे.

बेल्ट बकल्स

बेल्ट बकल्स

मध्ययुगीन काळातल्या आणि आधुनिक बेल्ट बकल्समधला फरक उघड आहे. आधुनिक काळात बकल्सची डिझाईन्स जास्तीत जास्त तुकतुकीत, आटोपशीर आणि सुटसुटीत आहेत, तर त्या काळात वापरले जाणारे बकल्स कोरीवकामाने अक्षरशः मढलेले आणि काहीसे ओबडधोबड असत. या कोरीवकामात युद्ध प्रसंग, त्यात सहभागी असलेले प्राणी यांची चित्रं रेखाटलेली असत. मात्र हे बकल्स खूप मजबूत आणि टिकाऊ होती आणि प्रामुख्याने ती श्रीमंत वर्गाची मक्तेदारी होती.
 

तंतुवाद्य

तंतुवाद्य

फोटो दाखवलेलं मध्ययुगीन काळातलं गिटर्न हे वाद्य म्हणजे आजच्या गिटारीचा पूर्वज. त्याचा भोपळा अर्धगोलाकारात असे. आज त्यात काळानुरूप बदल झाला आहे. आताची गिटार पूर्णपणे अर्धगोलाकार नसून काहीशी कमनीय आहे. असं असलं तरी गिटर्न हा गिटारीचा पूर्वज तुलनेत वजनाला हलका होता आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ध्वनी तीक्ष्ण असे.
 

लहान मुलांचे बूट

लहान मुलांचे बूट

त्या काळात बूट मुख्यतः कातडी आणि शिवलेले असायचे. त्यामुळे ओबडधोबड असले तरी ते मजबूत असत. आता त्यामध्ये कातडी, प्लास्टिक, कापड, रबर अशी विविध मटेरियल्स वापरली जातात. डिझाईनमध्ये तर बरेच पर्याय आहेत. मात्र कातडी बुटांची सर कशालाच नाही हेही तितकंच खरं.

साठवणुकीची साधनं

साठवणुकीची साधनं

आत्ता साठवणुकीसाठी सर्रास प्लास्टिकचे डबे वापरले जातात. मध्ययुगीन काळात मात्र ओक किंवा तत्सम झाडाच्या लाकडापासून बनवलेल्या पेट्या साठवण्यासाठी वापरल्या जात. त्याला लोखंडी कुलूपपट्या आणि लोखंडी बिजागऱ्या असत, ज्याच्या साह्याने या पेट्या व्यवस्थित बंद करता येत.

चिमटे किंवा कानकोरण्यासारखी हत्यारे

चिमटे किंवा कानकोरण्यासारखी हत्यारे

आजकालचे केस उपटण्याचे किंवा तत्सम चिमटे मुख्यत: स्टेनलेस स्टीलचे असतात आणि त्याच्या दोन्ही बाजू टोकाशी चपट्या असतात. पूर्वीचे चिमटे मात्र तांब्याच्या संमिश्रापासून बनवलेले असत आणि त्याच्या बाजू टोकाशी काटकोनात वळत.
 

खेळण्यातले घोडे

खेळण्यातले घोडे

पूर्वीचे लाकडापासून बनवलेले आणि खाली चाक असलेले, ओबडधोबड दिसणारे खेळण्यातले घोडे आणि आजकालच्या खेळण्याच्या दुकानांमधले हुबेहूब दिसणारे, दणकट असे रबरी किंवा प्लॅस्टिकचे घोडे यात खूप फरक आहे. पण तरी त्या लाकडी खेळण्यांशी खेळण्यातली मजा काही औरच असणार, नाही का?
 

चमचे

चमचे

या फोटोतल्यानुसार आधुनिक काळात वापरले जाणारे स्टीलचे चकचकीत चमचे मध्ययुगीन काळातल्या चमच्यापेक्षा जास्त भाव खाऊन गेले, तरी तो चमचा चांदीचा आहे बरं का! रचनेतील फरक म्हणाल तर त्याचा खोलगट आकार बराच मोठा आणि त्या मानाने दांडा फारच बारीक आहे. शिवाय दांड्याचा आकारदेखील षटकोनी आहे, जो आजकाल चपटा असतो.

पलंग

पलंग

उच्च दर्जाचे कोरीवकाम केलेले लाकडी पलंग त्या काळात प्रचलित होते. कोरीव काम करताना सोनं, मौल्यवान खडे, रत्नं यांचा उपयोग केला जाई. किंबहुना सगळ्याच फर्निचरवर त्याकाळी कोरीवकाम केलेलं असायचं. पलंगावरच्या गाद्यांमध्ये लोकर, गवत यांचा भरण म्हणून वापर केला जाई. श्रीमंत लोकांच्या घरातले पलंग जमिनीपासून उंचीवर असत. कधीकधी ते इतके उंच असत की त्यावर चढण्यासाठी स्टुलाचा वापर करावा लागे. गरीब लोक मात्र गवत, लोकर, पिसं यापासून बनवलेल्या चटया झोपण्यासाठी वापरत असत.
 

कात्री

कात्री

फोटो डावीकडे दाखवलेली खात्री चौदाव्या शतकातील असून ती लोखंडी आहे. आजकालच्या कात्र्यांच्या तुलनेत या काळातल्या कात्र्यांच्या मुठी अतिशय बारीक असत. शिवाय कात्र्यांच्या पात्यांवर बनवणाऱ्याचं नावही कोरलेलं असे.
 

टेबल/ डेस्क

टेबल/ डेस्क

लिहिण्यासाठी किंवा कॉम्प्युटर, लॅपटॉप ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डेस्कमध्ये आज बरीच विविधता बघायला मिळते. डिझाईन, मटेरियल, आराम, सहजसुलभता या सगळ्यांच बाबतीत यामध्ये असंख्य पर्याय आहेत. मात्र मध्ययुगीन काळात लिहिण्यासाठी वापरलं जाणारं हे लाकडी उतरत्या मांडणीचं मेज, त्यावर लिहिण्यासाठी वापरायचं क्विल(पीस) ठेवण्यासाठी खास तयार केलेली खाच, त्यात नेटकं खोचून ठेवलेलं पीस, बाजूला असलेला पितळी मेणबत्ती स्टँड हा सगळा माहोल एक नॉस्टॅल्जिक फील नक्कीच देतो. जोडीला ठेवलेली उंच पाठीची, तक्क्या असलेली खुर्ची ही बैठक जास्तीत जास्त आरामदायी व्हावी अशी डिझाइन केलेली असे.

हातकड्या किंवा बेड्या

हातकड्या किंवा बेड्या


मध्ययुगीन काळात बेड्या वर्तुळाकार असत. त्यामुळे मनगटावर अधिक घट्ट पकड घेता येत असे आणि हालचाली करायला वावही कमी राहत असे.

युद्धात वापरण्याची शिरस्त्राणे

युद्धात वापरण्याची शिरस्त्राणे

ही शिरस्त्राणे बहुधा लोखंडाची बनवलेली असत. मध्ययुगीन काळाच्या उत्तरार्धात चेहराही बेसिकनेट या जाळीच्या साह्याने पूर्णपणे झाकता येऊ लागला. अर्थात ही सुविधा अमीर-उमराव, सरदार यांच्यापुरतीच मर्यादित होती. ग्रेट हेल्म हे शिरस्त्राणे त्या काळात त्याची संरक्षण करण्याची क्षमता आणि चांगली दृश्यमानता यामुळे त्या काळात बरंच प्रसिद्ध होतं
 

लिहिण्याची साधनं

लिहिण्याची साधनं

बॉलपेन, शाईपेन, जेलपेन- त्यातही आधी रेनॉल्ड्स, मग सोनेरी टोपणवाला हिरो, मग पुढे 'मेड इन जपान' लक्झर कंपनीचं पायलट पेन- यांनी आपल्या पिढीचं शालेय जीवन समृद्ध केलं. तसंच काहीसं मध्ययुगीन काळाचं. तेव्हा लेखनासाठी वेगळी साधनं होती. त्यापैकीच एक म्हणजे स्टायलस म्हणजे थोडक्यात लेखण्या!! तांब्याच्या संमिश्रापासून बनवलेल्या आणि अणकुचीदार अशा या लेखण्या मुख्यतः भूर्जपत्रावर कोरीव काम करण्यासाठी वापरल्या जात. त्यांच्या निब म्हणून लोखंडी निब्ज किंवा छोट्या हाडांपासून बनवलेल्या पिना वापरल्या जात.
 

ड्रिंकिंग अर्थात पेयपानाची साधनं

ड्रिंकिंग अर्थात पेयपानाची साधनं

आजकाल काचेच्या ग्लासेसच्या आकारात इतकी व्हरायटी आहे की बघूनच डोळे विस्फारतात. अगदी एखाद्या काचेच्या भांड्याच्या दुकानात गेल्यावर "विकत घ्या किंवा घेऊ नका, नजरेची श्रीमंती कशाला नाकारा?'' असं होतं. मात्र हे विविध आकारांचे ग्लास कितीही मनोहारी दिसले तरी मध्ययुगीन काळात मुख्यत्वेकरून अमीर उमराव सरदारांच्या मेजवान्या आणि उत्सवप्रसंगी पेयपानासाठी जे ड्रिंकिंग हॉर्न वापरलं जाई त्याला तोड नाही. गाई, बैल, गवे, हरणं अशा प्राण्यांच्या शिंगापासून या प्रकारचे ग्लास बनवले जात. त्यावर धातूंचं लेपन करून ण करून त्यांना एक रिच लूक दिला जाई. अगदी काच, लाकूड, सिरॅमिक किंवा धातूच्या ग्लासनाही कधीकधी मुद्दाम ड्रिंकिंग हॉर्नचा आकार दिला जाई. या वस्तू आज अँटिक म्हणून चांगल्याच प्रसिद्ध आहेत.

आजच्या यंत्रं, कारखाने उपलब्ध असण्याच्या काळात अनेक पर्याय उपलब्ध असणं यात काही आश्चर्य नही, पण तुटपुंज्या साधनसामुग्रीच्या काळातली कोरीव कामं आणि सुबकता पाहिली की थक्क व्हायला होतं यात दुमत नाही!!