सैन्य आणि महिला हे समीकरण अजूनही जगात हवे त्या प्रमाणात जुळून आलेले नाही. लष्कराशी संबंधित इतर अनेक क्षेत्र जसे हवाईदल या क्षेत्रांमध्ये महिला स्वत:ला सिध्द करत आहेत. पण थेट युद्धभूमीवर उतरणे हे महिलांसाठी पुरेसे शक्य झालेले नाही. मात्र अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल, पण किमान भारतात तरी पुरुष जवान जे युद्धभूमीवर शौर्य गाजवतात त्यांतल्या काहींना प्रशिक्षण देण्याचं काम एका महिलेने केलेले असते.
डॉ. सीमा राव हे नाव लष्कर आणि लष्करप्रेमी लोकांमध्ये आदराने घेतले जाते. सीमा राव या गेली २० वर्ष लष्करातील प्रमुख विभाग एनएसजी, बिएसएफ, गरुड कमांडो, पॅरा कमांडो, नेव्ही यासाठी तरुणांना मोफत प्रशिक्षण देत आहेत. सीमा राव आणि त्यांचे पती दीपक राव कोणताही स्वार्थ मनात न ठेवता फक्त देशसेवेच्या हेतूने हे काम पार पडत आहेत.



