भारतीय संघ सध्या टी -२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी (ICC T20 world cup) जोरदार तयारी करत आहे. आगामी टी -२० वर्ल्ड कप स्पर्धा ही येत्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००७ मध्ये एकमेव टी -२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर १५ वर्षे उलटून गेली आहेत, तरीदेखील भारतीय संघाला ही स्पर्धा जिंकता आली नाहीये. गेल्या १८ टी -२० सामन्यांच्या जर विचार केला, तर भारतीय संघाने २५ खेळाडूंना आजमावून पाहिलं आहे. यावरून स्पष्ट होत आहे की, भारतीय संघ टी -२० वर्ल्ड कप साठी संघ बांधणी करत आहे. यावरून हे स्पष्ट आहे की, यूएईमध्ये झालेल्या टी -२० वर्ल्ड कप स्पर्धेतील १० खेळाडू या वर्ल्ड कपमध्येही खेळताना दिसून येऊ शकतात. कोण आहेत ते खेळाडू? चला पाहूया.
टी -२० वर्ल्ड कप स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर, कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला जाणार यात काहीच शंका नाही. तसेच माजी कर्णधार विराट कोहली हा फॉर्ममध्ये नसेल तरीदेखील त्याला ऑस्ट्रेलियामध्ये खेळण्याचा चांगलाच अनुभव आहे. त्यामुळे त्याला देखील भारतीय संघात स्थान मिळणार. मध्यक्रामात फलंदाजी करणारा फलंदाज सूर्यकुमार यादवने देखील इंग्लिश गोलंदाजांची चांगलीच धुलाई केल्याचे पाहायला मिळाले होते. त्याने इंग्लंडविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी -२० सामन्यात शतक झळकावले होते. त्यामुळे सूर्यकुमार यादवला देखील भारतीय संघात स्थान दिले जाऊ शकते.
हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजाची जोरदार कामगिरी
भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा यांनी देखील गेल्या काही महिन्यांपासून चांगली कामगिरी केली आहे. आयपीएल २०२२ स्पर्धेत हार्दिक पंड्याने जोरदार कामगिरी करत गुजरात टायटन्स संघाला विजय मिळवून दिला होता. यादरम्यान गोलंदाजी, फलंदाजी आणि नेतृत्व या तीनही बाबतीत तो हिट ठरला होता. तर रवींद्र जडेजा देखील चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंचं स्थान देखील जवळ जवळ निश्चित आहे. केएल राहुल देखील दुखापतीनंतर भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. तसेच रिषभ पंत, ईशान किशन, जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार सारखे खेळाडू सध्या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. या खेळाडूंनी गतवर्षी झालेल्या टी -२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
आणखी २ वेगवान गोलंदाजांचा शोध..
आगामी टी -२० वर्ल्ड कप स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला आणखी २ वेगवान गोलंदाजांची गरज पडू शकते. ज्यामध्ये हर्षल पटेल, आवेश खान, दीपक चाहर आणि अर्शदीप सिंग सारखे गोलंदाज रांगेत आहेत. तर फिरकी गोलंदाज म्हणून युजवेंद्र चहल खेळू शकतो. कारण गतवर्षी देखील तो याच संघात होता. तसेच श्रेयस अय्यर आणि दिनेश कार्तिक देखील शर्यतीत आहेत. मात्र संजू सॅमसन आणि दीपक हुड्डा यांना संधी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.
टी -२० वर्ल्ड कप २०२२ स्पर्धा येत्या ऑक्टोबर - नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे.




